रोजगार हमी योजनेसाठी गीरणे ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती पायगुडे पुढे सरसावल्या. १६० जॉब कार्डचे वाटप
तळा : संजय रिकामे
रोजगाराअभावी ग्रामीण भागातील जनतेचे वाढते स्थलांतर थांबावे त्याकरिता केंद्र आणि राज्य शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अमलात आणली आहे. या योजनेमध्ये ज्या कुटुंबाने किंवा व्यक्तीने रोजगाराची मागणी केली त्याला वर्षाकाठी शंभर दिवस रोजगार देण्याची हमी सदर योजनेत देण्यात आलेली आहे. गीरणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.ज्योती कैलास पायगुडे यांनी रोजगार हमी योजनेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून १६० जॉब कार्डचे वाटप गिरणे ग्रामपंचायतीत केले.
भारत सरकारचा रोजगार हमी योजनेचा कायदा आहे. त्यात वर्षातले किमान शंभर दिवस रोजगार मिळण्याची हमी आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचीही स्वतंत्र रोजगार हमी योजना असून, त्यामध्ये मागेल तितके दिवस रोजगार मिळण्याची हमी आहे. यात किमान वेतन दर २३८ रुपये असून त्यासोबत आवश्यक त्या सुविधा आणि संरक्षण याचीही व्यवस्था आहे. ही योजना तळ्या सारख्या भागामध्ये अत्यंत गरजेची असूनही का राबवली जात नसावी? याबाबत गिरणे सरपंच ज्योती पायगुडे यांनी अभ्यास करून जनजागृती केली खरे तर रोजगार हमी योजनेचा कायदा अत्यंत पारदर्शी आणि लोकांच्या हिताचा आहे. त्यासाठी कायद्याप्रमाणे योजनेची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. आम्ही रोजगार हमी योजना सुरू होण्यासाठी लोकांची जागृती केली. जर कायद्यानुसार योजनेची अंमलबजावणी झाली, तर अडचणी राहणार नाहीत याचा दिलासा लोकांना दिला. लोकांना सोबत घेऊन काही गावांत ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला.
थेट ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांवरील मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावी, असे आवाहन सरपंच सौ. ज्योती पायगुडे यांनी केले आहे. वैयक्तिक सिंचन विहीर, शेततळे, जनावरांचा गोठा, शेळी पालन शेड, कुक्कुट पालन शेड,वैयक्तिक शौचालय, शोष खड्डा, रेशीम लागवड, वैयक्तिक वृक्ष लागवड, फळबाग लागवड, ढाळीचे बांध, घरकुल नाडेप खत टाके, गांडूळ खत टाके, विहीर पुनर्भरण अशा प्रकारच्या कामांना शासनाने मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनात असलेले जडत्व, त्यामुळे शासकीय योजनांविषयी लोक उदासीन आहेत. गावात होणाऱ्या ग्रामसभा या विशिष्ट समूहापुरत्याच मर्यादित राहतात. त्याच्या आयोजनामागे लोकांच्या सहभागाची इच्छा दिसून येत नाही. ग्रामपंचायत कार्यालये कधी तरीच उघडली जातात. गावपातळीवरील शासकीय कर्मचाऱ्यांना लोकांकडे जाण्याची आवश्यकता वाटत नाही. लोकच जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांना शोधत फिरतात. हे चित्र तालुक्यात असताना कोरोना संकटात सर्वसामान्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने सरपंच सौ. पायगुडे यांनी उचलेले पाऊल इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श ठरू शकते.
"थेट ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वरदान ठरली आहे. रोजगार हमीच्या कामांवरील मजुरीतही वाढ करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावी."
- सौ. ज्योती कैलास पायगुडे, गिरणे ग्रामपंचायत सरपंच