रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायत निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला 

तळा : संजय रिकामे

नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची काल शेवटची तारीख होती. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असल्यामुळे इथे कुणी स्वबळावर तर कुणी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु स्वबळ की आघाडी याचा अंतिम फैसला उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होईल. 

रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. या निमित्ताने राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म पर्यटन फलोत्पादन,क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहीती व जनसंपर्क विधि व न्याय तथा पालकमंत्री रायगड ना.अदिती तटकरे यांच्यासह शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी, शेकाप, वंचित अशा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केले. 

तळा नगरपंचायतींसाठी  ३९ , माणगाव ४८  म्हसळा ४०  पोलादपूर ५८  पाली ४८ खालापूर ५२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कांग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, वंचित या पक्षांनी स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. सहा नगर पंचायतीत प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक होत असून, १३ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

२१ डिसेंबर रोजी मतदान तर २२ तारखेला मतमोजणी होणार आहे. तळा, माणगाव, म्हसळा नगरपंचायतीत पालकमंत्री ना.अदिती तटकरे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, ॲड.राजीव साबळे,खालापूर मध्ये शिवसेना आ.महेंद्र थोरवे, शेकाप आ.जयंत पाटील माजी आ.सुरेश लाड,पाली मध्ये भाजप आमदार रविशेठ पाटील, माजी आ.धैर्यशील पाटील, पोलादपूरमध्ये आ. भरतशेठ गोगावले काँग्रेसचे हनुमंत जगताप या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगरपंचायत आपल्या ताब्यात यावी यासाठी सगळ्यांनी जोर लावला आहे.

Popular posts from this blog