रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात "अज्ञानी" हवालदार!
या थातूरमातूर पोलीसांना "दिवाणी" आणि "फौजदारी" यांतील फरक कळत नाही!
अवैध धंद्यांची पाठराखण आणि भ्रष्टाचाऱ्यांची दलाली!
रायगड जिल्ह्यात ठाणे अंमलदारांना योग्य प्रशिक्षण मिळणे गरजेचे!
रायगड : किशोर केणी
तक्रार दाखल करण्याचा अधिकार सर्वांना आहे, त्याप्रमाणेच आलेली तक्रार ही तक्रारदारांच्या शब्दांत नोंदवून घेणे हे पोलीसांचे कर्तव्य आहे! पण हल्लीच्या काही 'थातुरमातुर' पोलीसांना कायद्याचे ज्ञान थोडेसे तोकडे असल्याचे अनेक प्रकारच्या घटनांमध्ये दिसून आलेले आहे. कारण तक्रारी दोन प्रकारच्या असतात. त्या म्हणजे "दिवाणी" आणि "फौजदारी" स्वरूपाच्या तक्रारी! परंतु काही पोलीस ठाण्यातील "नवशिके" हवालदार स्वतःला "न्यायाधीश" समजू लागले असून एखादी "दिवाणी" स्वरूपाची तक्रार असेल तर त्यासाठी न्यायालयाचा रस्ता दाखविणे गरजेचे आहे, पण त्यातूनही काही (हरामाची) कमाई होतेय का? यासाठीही काही "निर्लज्ज" पोलीसांचे प्रयत्न सुरू असल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत!
जनता जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडते, तेव्हा-तेव्हा ती रक्षणाच्या दृष्टीने पोलीसांकडेच धाव घेत असते म्हणूनच पोलीसांना "जनतेचे रक्षक" असे म्हटले जाते. महाराष्ट्र पोलीसांनी "एक कार्यक्षम पोलीस दल" म्हणून लौकीक मिळविलेला आहे. परंतु काही भ्रष्ट पोलीसांच्या घाणेरड्या सवयींमुळे पोलीस दलाची नाहक बदनामी होत चालली आहे. अवैध धंद्यांची पाठराखण आणि भ्रष्टाचाऱ्यांची दलाली करणे ही तर काही पोलीसांची खासियत बनून राहिल्याने असे पोलीस म्हणजे पोलीस दलाला लागलेली 'कीड' आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पूर्वीच्या काळात "पोलीस" हा शब्द ऐकल्यावर जनतेचे रक्षण करणारा रूबाबदार चेहरा समोर येत होता. पण सध्याच्या परिस्थिती पाहता "पोलीस" हा शब्द ऐकल्यावर अवैध धंदेवाल्यांच्या ताटाखालचा मांजर! असेच संतापाने म्हटले जाते. कारण सध्याच्या परिस्थितीत पोलीसांनी मटका-जुगार यांसारख्या अवैध धंद्यांना पाठबळ दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
विशेष म्हणजे सर्व पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अंमलदार कार्यरत असतात, परंतु काही पोलीस ठाण्यात आज देखील असे काही "बिनडोक हवालदार" आहेत की, ज्यांना "दिवाणी" आणि "फौजदारी" या दोन शब्दांमधील फरक कळत नाही, ही पोलीस दलाची शोकांतिका आहे! परिणामी कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याप्रकरणी तातडीने दखल घेऊन प्रत्येक प्रत्येक पोलीस ठाण्यांना याबाबत सूचना देणे गरजेचे आहे.