नागोठणेमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस, महसूल विभाग आणि ग्रामपंचायतीची संयुक्त कारवाई 

नागोठणे : राज वैशंपायन

नागोठणेमध्ये विनामस्क फिरणाऱ्या लोकांवर महसुल विभाग, पोलीस व ग्रामपंचायत अशी संयुक्त कारवाई करण्यात आली. 

राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम पाळण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंतच्या अनेक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक जिल्ह्यांत संचारबंदी, जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून काही ठिकाणी हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट आणि विवाह-मंगल कार्यालयांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याच  पार्श्वभूमीवर नागोठणेमध्ये तिन्ही विभागाची मिळून संयुक्तरित्या विना मास्क कारवाई मोहीम राबविण्यात  आली. यामध्ये मास्क न लावता किंवा अयोग्य रितीने मास्क लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली आहे. मास्क नसल्यास मास्क वापराच्या मूळ उद्दिष्ट्यांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये रोहा तहसिलदार कविता जाधव, नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत, रोहा पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, नागोठणे ग्रामपंचायतचे ग्रामविस्तार अधिकारी मोहन दिवकर, पोलीस कॉन्स्टेबल गंगाराम ढुमणे आदींचा समावेश होता.

Popular posts from this blog