तळा येथे मटका जुगार तेजीत, पोलीसांचे दुर्लक्ष!
तळा येथील मटका जुगार कायमस्वरूपी बंद करावा : ॲड. काशिनाथ ठाकूर यांची तक्रार
रायगड : प्रतिनिधी
तळा येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून येथील अवैध मटका जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.
तळा येथे बँक ऑफ इंडियाच्या बाजूला पाणपोईच्या पाठीमागे मटका-जुगार सुरू असून अनेक तरूण व वयोवृद्ध या मटका जुगाराच्या आहारी गोल्याचे दिसत आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचा मटका फोनवर व हिंडता-फिरता घेणे सुरू आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी आकडे लावण्याच्या चिठ्ठ्या दिल्या जात आहेत. या मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन येथील मटका जुगाराचा धंदा कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी व या अवैध मटका-जुगाराला साथ देणाऱ्या पोलीसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.