गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष रहावे : नागोठणे पोलीसांचे आवाहन

नागोठणे : राज वैशंपायन

गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तानाजी नारनवर यांनी केले आहे.

समाजामध्ये कायदा, सुव्यवस्था आणि शांतता कायम राखण्याच्या दृष्टीने पोलीसांप्रमाणेच दक्ष नागरिक हादेखील एक महत्त्वाचा घटक समजला जातो. परिणामी दक्ष नागरिकांच्या सहकार्यातून गुन्हेगारी नष्ट करणे शक्य होईल. आपल्या परिसरात एखादी अनोळखी संशयास्पद व्यक्ती अथवा बेवारस संशयास्पद वस्तू आढळल्यास नागरिकांनीही संबंधित संशयास्पद व्यक्तीती चौकशी करावी व तात्काळ पोलीसांना खबर द्यावी जेणेकरून पोलीस योग्य वेळी घटनास्थळी जाऊन पुढील दुर्घटना रोखू शकतील. गाडीमध्ये प्रवास करताना अनोळखी इसमांकडून प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार घडत असतात. परिणामी अशा प्रकारांची पुनरावृती होऊ नये यासाठी प्रवाशांनीही गाडीमध्ये प्रवास करताना अनोळखी सहप्रवाशांपासून सावध रहावे व सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी देऊ केलेले कोणतेही खाद्य पदार्थ स्वीकारू नये. परिसरातील रस्यांवर वाहतूक कोंडी होण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होत असतो. परिणामी बाजारेठेतील दुकानदार व व्यापारी वर्गाने तसेच वाहनचालकांनी देखील याबाबत विशेष दक्षता घेऊन याठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारी च्या संदर्भात शासनाने जारी केलेल्या नियमांचे सर्व नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे वाहनचालकांनी देखील वाहतूकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी होण्याच्या घटना व गाडीमध्ये प्रवास करताना दागिने व मौल्यवान वस्तू चोरी होण्याच्या घटना घडत असल्याने अशा घटनांना आपल्या परिसरात पायबंद घालण्यासाठी नागरिकांनी व विशेष करून महिलांनी दक्ष रहावे असेही आवाहन नागोठणे पोलीसांतर्फे करण्यात आले आहे.

नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर, पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी या परिसरात कायदा-सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता घेतलेली असून परिसरात कोणतेही गैरप्रकार अथवा अवैध धंद्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नागोठणे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी जागोजागी साध्या वेशात गस्त घालत असतात. 


Popular posts from this blog