ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोलाड पोलीसांना निवेदन
कोलाड : प्रतिनिधी
मागील २ वर्षे कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला. या संकटाला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. यातून मार्ग काढत जनजीवन पूर्ववत जरी झाले असले तरी 'ओमिक्रॉन' सारख्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अशा वेळी ३१ डिसेंबरला पार्ट्यांच्या माध्यमातून 'ओमिक्रॉन'चा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे. या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणार्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर (‘सेलिब्रेशन’वर) बंदी घालावी. ख्रिस्ती नववर्षारंभाच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या निमित्ताने पर्यटनस्थळे, ऐतिहासिक अन् सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धुम्रपान, पार्ट्या करताना होणारे गैरप्रकार रोखले जावेत या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या प्रतिनिधींसह विविध धर्मप्रेमींच्या वतीने कोलाड पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी चंद्रकांत लोखंडे, विजय बोरकर, ज्ञानेश्वर खांमकर, प्रविण शिंदे, निलेश गोरीवले, प्रमोद लोखंडे, महेश शिरसाट, दिनेश खराडे यांच्या उपस्थितीत कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांना निवेदन देण्यात आले.