तळा शहरातील जनतेने भाजपला एकदा संधी द्यावी - प्रवीण दरेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष - माजी आमदार श्याम सावंत
तळा : संजय रिकामे
महाआघाडी सरकार आज सर्व बाजूंनी अपयशी आहे.शेतकरी बांधवांना अजूनही नुकसान भरपाई दिलेली नाही एस.टी. कर्मचाऱ्यांची काय अवस्था सरकारने करून ठेवली आहे. गरीब जनतेच्या डोळ्यात आज अश्रू पहायला मिळत आहेत. सरकारचा नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यामधे चांगल्या प्रकारचे यश आज पक्षाला मिळत आहे. ग्रामपंचायत पासून ते खासदार पर्यंत भाजपा सदस्यांची संख्या जास्त आहे.
भारतीय जनता पक्षाच्या रूपाने मी तळा शहरातील जनतेला सक्षम पर्याय देत आहे. या निवडणुकीत कुठलीही घराणेशाही नसून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात आली असल्यामुळे जनतेने धाडसी निर्णय घ्यावा. फक्त मला एकदा संधी द्यावी; विकास काय असतो ते मी तालुक्यातील जनतेला दाखवितो, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी तळा नगरपंचायत जाहीर प्रचार सभेत केले. यावेळी माजी आ. श्याम सावंत, जिल्हा अध्यक्ष ॲड. महेश मोहिते, महाराष्ट्र प्रदेश सचिव राविभाऊ मुंढे, नगरपंचायत माजी नगराध्यक्ष सौ.रेश्मा मुंढे, तालुका अध्यक्ष ॲड. निलेश रातवडकर, शहर अध्यक्ष सुधीर तळकर, सरचिटणीस रमेश लोखंडे, रायगड महिला जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, युवा शहर अध्यक्ष सुयोग बारटक्के, महिला शहर अध्यक्ष अमृता टिळक, मंगेश सावंत, विलास ठसाळ, सुरेश शिंदे, रितेश मुंढे, भैरव मेहता प्रभागातील सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेली तीस ते पस्तीस वर्षे ज्यांना आपण निवडून दिलेत ते तटकरे आणि त्यांचे कुटुंबीय आज पुन्हा येऊन खोटी आश्वासने देत आहेत यांच्या घरात पदे आणि त्या पदातून सत्ता आणि पैसा हेच राजकारण सुरू आहे सर्वसामान्य मात्र भरडला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला शिवसेनेची तीच अवस्था झाली आहे ज्यांनी शिवसेना घडवली ते रामदास कदम यांची काय दशा करून ठेवली आहे जे आपल्या नेत्याला न्याय मिळवून देऊ शकत नाहीत ते जनतेला काय न्याय मिळवून देणार अशी टीका त्यांनी यावेळी केली.
आजचा पेपर वाचला या पेपरच्या पहिल्या पानावर उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि खा.सुनील तटकरे एकमेकांवर केलेले आरोप आणि प्रत्यारोप वाचले. वा रे.. वा, राज्यात मांडीला मांडी लावून काम करायचे आणि येथे येऊन एकमेकांवर टीका करायची. तळ्यातील नागरिक आता सुज्ञ असून यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. मागील ५ वर्षे देसाई साहेब उद्योगमंत्री आहेत का नाहीत आणले कारखाने सुनील तटकरे यांच्याकडे जिल्हा परिषद अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार गेली अनेक वर्षे असताना का नाही पाणी योजना आणली. या दोन्ही पक्षांना तळेकरांनी संधी दिली पण त्या संधीचा विश्वासघात या दोन्ही पक्षांनी केला असल्यामुळे एकदा भाजपला संधी देऊन बघा मी स्वतः या शहराचा कायापालट करेन असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
पाणी योजने बाबत श्रेयवाद सुरू आहे. पाणी योजना पूर्ण व्हावी यासाठी भाजपा नगराध्यक्ष रेश्मा मुंढे यांची तळमळ मी स्वतः पहिली आहे सर्व पाठपुरावा यांनी करायचा आणि श्रेय मात्र दुसऱ्यांनी घ्यायचे हे जनतेला आता कळत असून शिवसेनेचे स्थानिक पुढारी पावडा आपल्याकडे ओढण्याचे आणि पैसे खाण्याचे काम करत आहेत यांना जवळ करू नका दोन दिवस राहिले आहेत कोणाच्या पैशाच्या अमिषाला बळी पडू नका आपले लाखमोलाचे मत भाजपा उमेदवारांच्या कमळ हे चिन्ह दाबून बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष असल्याची जहरी टीका श्रीवर्धन मतदार संघाचे माजी आमदार श्याम सावंत यांनी केली गेली पंधरा वर्षे मी आमदार असताना झालेली कामे या मतदार संघात दिसत आहेत. परंतु केवळ तटकरे कुटुंबाचा आर्थिक विकास झाला झाला असल्याची टीका त्यांनी केली म्हणून सर्व कुटुंबाला आज प्रचारासाठी घरोघरी जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी महेश मोहिते, रवि मुंढे यांनी देखील आपले मनोगत मांडले.