तळा नगरपंचायत निवडणूकीसाठी १७ जागांसाठी ७७ अर्ज दाखल
तळा : संजय रिकामे
तळा नगरपंचायत निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार असुन प्रत्येक राजकीय पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढवत असुन नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी एकूण ७९ नामनिर्देशन अर्ज आज दाखल करण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले.
यामध्ये शिवसेनेकडून १५ जागांवर नामनिर्देशन अर्ज भरण्यात आले आहेत. तर दोन ठिकाणी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून १७ पैकी १३ ठिकाणी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत तर भारतीय जनता पार्टी कडून १७ पैकी ८ उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले तर काही ठिकाणी अपक्ष भाजपा पुरस्कृत उमेदवारांचे अर्ज भरण्यात आलेले आहेत. या निवडणुकीत शेकाप त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि मनसे पक्ष देखील आपले नशीब आजमावणार आहेत शेकाप आणि मनसे कडून दोन प्रभागात तर वंचित एका ठिकाणी आपले नशीब आजमवणार आहेत.त्याचप्रमाणे अपक्ष देखील आपले नशीब आजमावणार आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू होती. शिवसेना पक्षाने काल आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, ॲड. राजीव साबळे, तालुका प्रमुख प्रद्युम्न ढसाळ, शहर प्रमुख राकेश वडके व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातून रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी आ. अनिकेत तटकरे, तालुका अध्यक्ष नाना भौड, शहर अध्यक्ष महेंद्र कजबजे, चंद्रकांत रोडे आदी मान्यवर उपस्थित होते. ओबीसी रद्द झाल्याने संभ्रमाचे वातावरण उमेदवारांमध्ये पहायला मिळाले.