कोलाड येथे मटका जुगार आणि चक्री जुगार तेजीत, पोलीसांना पोहोचतोय हफ्ता?
कोलाड येथील मटका जुगार कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा तालुक्यातील कोलाड येथे मटका माफीयांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला असून पोलीसांना हफ्ता पोहोचत असल्यामुळे येथील अवैध मटका जुगाराकडे पोलीसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोलाड पोलीस ठाण्याचे सहायंयक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे कायदा-सुव्यवस्थेवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. या मटका जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
येथे मटका जुगार जोमात सुरू असल्यामुळे पोलीसांना सध्या सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. येथील बेकायदा जुगारामुळे पोलीसांच्या उत्पन्नात कमालीची वाढ झाल्याचे चर्चिले जात आहे. येथील मटका जुगार कायमस्वरूपी कधी बंद होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिकांसमोर उभा राहिलेला आहे.