रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोयनाड, तळा, इंदापूर, म्हसळा, श्रीवर्धन येथे मटका जुगार सुरू, पोलीसांची चांदी!
ॲड. काशिनाथ ठाकूर यांची गृहमंत्री व पोलीस महासंचालकांकडे तक्रार
रायगड : किशोर केणी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोयनाड, तळा, इंदापूर, म्हसळा, श्रीवर्धन येथे बेकायदा मटका जुगार सुरू असून या अवैध धंद्यांमुळे पोलीसांना सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. येथील अवैध मटका जुगाराचे धंदे म्हणजे पोलीसांचे उत्पन्नाचे साधन बनून राहिले असून या अवैध धंद्यांमुळे येथील पोलीसांची चांदी होत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.
मटका-जुगाराचे जाळे हे दिवसेंदिवस वाढतच चालले असून या अवैध धंद्यांमुळे पोलीसांचे खिसा मात्र गरम झालेला आहे. परंतु या अवैध धंद्यांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत चालले आहेत. "कानून के हाथ लंबे होते है" हे वाक्य आपण ऐकलेले असेलच, पण अवैध धंद्यांवर कारवाई करताना पोलीसांचे हात तोकडे का होतात? हा संशोधनाचा विषय बनून राहिला आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोयनाड, तळा, इंदापूर, म्हसळा, श्रीवर्धन येथे सुरू असलेल्या मटका-जुगारावर तातडीने कारवाई करावी अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे.