धुक्याचा फायदा घेऊन सोडले जातेय प्रदूषण, नागरिकांच्या आरोग्याला धोका!
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
धाटाव/रोहा : किरण मोरे
धाटाव औद्योगिक कंपन्यांपासून होणाऱ्या वाढत्या प्रदूषणाला रोखण्याचे काम प्रदुषण नियंत्रण मंडळाचे असताना याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
धाटाव व पंचक्रोशीतील शेतकरी आणि बागयतदार यांना हे प्रदूषण म्हणजे कायमचीच डोकेदुखी बनून राहिली आहे. वायूप्रदुषण तर आहेच, त्याशिवाय येथील कपन्यांतून सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त दूषित पाण्याने जल आणि जमिन यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
धाटाव पचंक्रोशीतील १४ गावांच्या शेतकऱ्यांना औद्योगीक महामंडाळाने नुकसानभरपाई दिली पाहिजे अशी मागणी पुढे येत आहे. सकाळच्या धुक्याचा व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन येथील कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात प्रदूषण सोडण्याचा प्रकार वारंवार घडत असतो. मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
लहान बालके व वयोवृध्द नागरिकांना या प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या प्रदुषणामुळे नागरिकांना सकाळ-संध्याकाळ फिरणे मुश्कील झाले असुन येथील जनजीवन विस्कळीत होण्याच्या मार्गावर आलेले आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही प्रदुषण नियंत्रण मंडळ आवश्यक तेवढी कारवाई करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठांनी तातडीने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच जर का येथे मोठा अनर्थ घडला तर त्याला प्रदुषण मंडळच जबाबदार असेल असे नारिकांकडुन बोलले जात आहे.