रायगड विकास प्राधिकरणाच्या कामकाजाच्या पहाणी व चौकशी करिता जनसेवा संघटनेचे भारताच्या राष्ट्रपतींना पत्र
माणगांव : प्रतिनिधी
भारताचे महामहीम राष्ट्रपती लवकरच दुर्गराज किल्ले रायगडावर येत आहेत. यावेळी किल्ले रायगड आणि बाजूचा परिसरातील ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्यासाठी व विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या रायगड विकास प्राधिकरणाच्या कामाची पाहणी करून त्याची दखल घेण्यात याकरिता जनसेवा संघटना माणगाव यांच्याकडून राष्ट्रपतींना पत्र देण्यात आले आहे.
या पत्राचा सविस्तर मजकूर असा आहे की, मा. राष्ट्रपती महोदय, आपल्याला पत्र लिहिण्यास काही कारण आहे की,आम्ही महाराष्ट्र जिल्हा रायगड गावं देगाव तालुका माणगाव चे रहिवासी आहोत. दुर्गराज किल्ले रायगड आमच्या सर्व हिंदू समाज व संपुर्ण हिंदुस्थान चा मानबिंदू आहे. दुर्गराज किल्ले रायगड ही हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी राहिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा तेजस्वी कालखंड दुर्गराज रायगड राहिला आहे.
सन २०१७ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुर्गराज किल्ले रायगड चे जतन संवर्धनाकरिता रायगड विकास प्राधिकरण ची स्थापना करण्यात आली .या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज श्री संभाजी छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सर्व हिंदुस्थानी आणि आणि शिवप्रेमी यांना अतिशय आनंद झाला. यावेळी दुर्गराज रायगड व आसपासच्या परिसराच्या विकासाकरिता अंदाजित रक्कम ६०० कोटींचा निधी रायगड विकास प्राधिकरणाकरिता मंजूर करण्यात आला.
आजतागायत रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेला ४८ महिन्याच्या कालावधी उलटून गेला आहे. कोविड १९ चा ८ महिन्याचा कालावधी सोडल्यास उरलेल्या ४० महिन्यात आजपर्यंत रायगड विकास प्राधिकरणाने काय काम केले असा प्रश्न उपस्थित होत आहे? आम्ही एक शिवप्रेमी या नात्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ९/१२/२०२० रोजी दुर्गराज रायगड किल्ल्याच्या जतन संवर्धन कामामध्ये रायगड विकास प्राधिकरण भ्रष्टाचार करत आहे. अशा आशयाचे एक पत्र देण्यात आले होते. परंतु रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या दबावाखाली येऊन शासनाने यावर एक ही प्रश्न उपस्थित केला नाही. त्या पत्राची एक प्रत यासोबतच जोडत आहे.
महामहीम राष्ट्र्पती आपल्याला एक विनंती आहे की,आपण देशाचे प्रथम नागरिक आहात आम्हा सर्व शिवभक्तांना आनंद होत आहे की, दुर्गराज किल्ले रायगड वर आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरिता येत आहात. त्याकरिता आम्ही अभिवादन करतो की ,तेंव्हा आपण किल्ले रायगडावर हेलिकॉप्टर ने उतरू नये. कारण हेलिकॉप्टर उतरताना व उडताना येथील माती उडणार आहे ती धूळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर उडणार आहे. यामुळे आपला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा हेतू असफल होईल आणि संपूर्ण हिंदुस्थानातील शिवप्रेमी नाराज होतील. आपल्याला माहिती च असेल छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या हिंदुस्थान चे मानबिंदू आहेत.!
आपण आम्हाला क्षमा करावी की आम्ही तुम्हाला हे सांगण्याचे साहस करत आहोत की, आपण दुर्गराज रायगडावर स्मारक समिती च्या रोप-वे ने जावे आणि दुर्गराज रायगड किल्ल्याचे निरीक्षण करावे. त्यावेळी आपल्या लक्षात येईल की, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री संभाजी छत्रपती यांनी स्वतः च्या स्वार्थाकरिता, राजकारणाकरिता, किल्ले रायगड ची कशा प्रकारे दुर्गती करत आहेत. आम्ही एक सर्वसामान्य व्यक्ती आहोत. आमच्या मनात ज्या भावना आहेत त्या आपल्या समोर प्रकट केल्याआहेत. आम्ही आपल्याकडून एक आशा व्यक्त करत आहोत की, आपण आमचे पत्र वाचून कोणतीही व्यक्ती किंवा संस्था यांच्या दबावाखाली न येता सकारात्मकदृष्टीने याचा विचार कराल..!
अशा आशयाचे पत्र जनसेवा संघटना देगाव तालुका माणगाव चे अध्यक्ष ॲड. अनिकेत काशिनाथ ठाकूर यांच्याकडून भारताचे राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.