शिक्षकांच्या अनावश्यक बदल्यांमुळे विद्यार्थी पटसंख्येवर परिणाम
यावर्षीही दोन शाळा बंद पडण्याच्या मार्गावर
रोहा नगरपालिका प्रशासन अधिकारी कारवाईच्या रडारवर!
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा नगरपालिका प्रशासन अधिकाऱ्याच्या अकार्यक्षमतेमुळे सध्या शिक्षण विभागात एक वेगळाच गोंधळ सुरू असून शिक्षकांच्या अनावश्यक बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. यामुळे यावर्षीही दोन शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेल्या आहेत. परिणामी रोहा नगरपालिका प्रशासन अधिकारी आता कारवाईच्या रडारवर आहे!
रोहा नगर पालिकेच्या सहा मराठी प्राथमिक शाळांपैकी एकाही शाळेला संचमान्यतेनूसार मुख्याध्यापक पद मंजूर नाही आहे. तशी ऑनलाईन माहिती प्रशासन अधिकारी यांनी शासनाकडे सादर केली आहे. तरीही शाळा क्रमांक १ आणि शाळा क्रमांक १० च्या दोन मुख्याध्यापकांचे रिव्हर्शन का होत नाही? यामागे मोठा आर्थिक भ्रष्टाचार असण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
मंगलवाडी संकुलातील मराठी शाळांची ही दयनीय अवस्था प्रशासन अधिकाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे ओढवली आहे. एका शिक्षकाची हजेरी शाळा क्रमांक १० मध्ये लावतात आणि तो शिक्षक शाळा क्रमांक ३ मध्ये शिकवतो, त्या शिक्षकाला पुन्हा शाळा क्रमांक १० मध्ये हजर व्हायला सांगतात आणि त्याची बदली शाळा क्रमांक ८ मध्ये केली जाते. पाकिटाचे वजन कमी पडल्याने या शिक्षकाला शिक्षा झाली असल्याचे बोलले जात आहे.
या एका वर्षात मंगलवाडी संकुलात चार गुणवंत शिक्षकांची बदली करण्याची वेळ प्रशासन अधिकाऱ्याच्या निष्क्रीयतेमुळे आली आहे. मंगलवाडी संकुलातील या गुणवंत शिक्षकांच्या बदल्यांमुळे विद्यार्थी संख्या कमालीची घटली आहे. रोहा नगर पालिकेच्या दोन प्राथमिक शाळा कमी पटसंख्येमुळे यापुर्वीच बंद पडल्या आहेत. प्रशासन अधिकाऱ्याने शासनाकडे संचमान्यता सादर करताना ठेवलेल्या त्रुटींमुळे यावर्षी सुद्धा दोन शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मराठी शाळा जीवंत ठेवायचा असतील तर रोहा नगर पालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यावर वरिष्ठांकडून कडक कारवाई होणे गरजेचे आहे.