रोहा नगर पालिका शाळांतील ‘खेळखंडोबा’, शासनावर अतिरीक्त ताण!
पहिली ते सातवी वर्गांची पट पडताळणी करणे गरजेचे!
मुलांचा पोषण आहार भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात?
धाटाव/रोहा : किरण मोरे
रोहा नगर पालिकेच्या प्राथमिक शाळेत पहिली-दुसरीत अंगणवाडीची मुले तर शाळा सोडून गेलेल्या मुलांची परिक्षेला उपस्थिती दाखवली जाते. ज्यांनी शाळा सोडून अनेक वर्षे झाली किंवा जे कधीच शाळेत गेले नाहीत अशांची नावेही पटावर आढळतात. सीमावर्ती भागातून त्या मुलांना स्पेशल गाड्या करून आणले जाते आणि त्यांच्या नावावर आलेली स्कॉलरशिप हडप केली जाते.
रोहा नगर पालिकेने आणि तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी रोहा शहरातील सर्व शाळांची पहिली ते सातवी या वर्गांची पट-पडताळणी करणे गरजेचे आहे.
मतदान केल्यानंतर बोटाला लावतात तशी शाई लावून शाळांची पट-पडताळणी करून घेतली पाहिजे तरच प्रशासन अधिकाऱ्याचा बोगस कारभार बाहेर येईल. त्यातून किमान 20 टक्के विद्यार्थीसंख्या बोगस असल्याचे निदर्शनास येईल.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात शाळा बंद असताना शासनाने पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानासुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपामध्ये घोटाळा झालेला आहे. तांदूळ, मुग आणि चणा वाटप करण्यात आला नाही. बोगस पटाचा पोषण आहार प्रशासन अधिकाऱ्याच्या खिशात गेला आहे. हे सर्व वाटप मुख्याध्यापक करत असतो. खोट्या पटाची जबाबदारी सुद्धा मुख्याध्यापकाची असते. रोहा नगर पालिका शाळेचे मुख्याध्यापक प्रशासन अधिकाऱ्यांसाठी हा भ्रष्टाचार मुकाट्याने करतात, त्या बदल्यात शाळांमध्ये मुख्याध्यापक पद मंजूर नसताना त्यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती कायम रहाते. खोट्या पटाच्या अहवालामुळे अतिरिक्त शिक्षकांना अभय मिळते. अभय मिळालेल्या शिक्षकांकडून शिक्षण समितीच्या कार्यालयात टेबलचा ड्रॉवर गरम रहातो. मात्र याचा दरमहा लाखो रुपयांचा अनावश्यक भार शासनावर पडतो आहे.
लवकरच शाळांचा पट, प्रत्यक्ष उपस्थिती आणि वाटप केला जाणारा शालेय पोषण आहार याची माहिती मिळणे साठी माहितीच्या अधिकारात अर्ज केला जाणार आहे आणि प्रशासन अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचारामुळे शासनावर पडणाऱ्या अतिरिक्त आर्थिक ताण व्याजासह वसूल करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.