रोहा नगरपालिकेच्या मंगलवाडी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या फक्त कागदावरच, प्रत्यक्षात मात्र अर्ध्यापेक्षा कमी पटसंख्या! 

अतिरीक्त शिक्षकांना वाचविण्यासाठी खोटा पट दाखविण्याची कसरत? 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला धोका!

धाटाव/रोहा : किरण मोरे 

रोहा नगरपालिकेच्या मंगलवाडी शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या फक्त कागदावरच जास्त दाखविण्यात आलेली असून येथे प्रत्यक्षात मात्र अर्ध्यापेक्षाही कमी पटसंख्या असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. अतिरीक्त शिक्षकांना वाचविण्यासाठी ही अनोखी कसरत सुरू असल्याचे चर्चिले जात आहे. पण यामुळे विद्यार्थ्यांचा भवितव्याला धोका निर्माण झालेला आहे!

राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या रोह्याच्या गडमुळे बाई अतिशय कर्तृत्ववान शिक्षीका होत्या. त्या रोहा नगर पालिकेच्या रावसाहेब कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका असताना त्यांच्या शाळेत ७०० विद्यार्थी होते. लोकप्रियतेमुळे या शाळेत विद्यार्थ्यांचा ओघ वाढतच होता आणि इमारतीत वर्गांना जागा अपुरी पडू लागली. म्हणून मंगलवाडी संकुलात नवीन शाळा सुरू करण्यात आली. याच मंगलवाडी संकुलात दगडी शाळा सुद्धा सुरू करण्यात आली. 

एके काळी विद्यार्थी आणि दर्जेदार शिक्षणाचे ऐश्वर्य पाहिलेल्या मंगलवाडी संकुलाची आज दयनीय अवस्था आहे. वरसे, भुवनेश्वर, वराठी, खारी, पडम, खारापटी या आजूबाजूच्या ग्रामीण भागातून दारोदार फिरून, अमीष दाखवून विद्यार्थी गोळा करावे लागत आहेत. विद्यार्थी फक्त कागदावरच असतात, प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थिती पटाच्या निम्मी सुद्धा नसते. नगर पालिकेने दिलेल्या सुसज्ज इमारती आणि सोयी-सुविधा सुद्धा आता विद्यार्थ्यांना आकर्षित करु शकत नाहीत. सतत गैरहजर असणारा आणि निष्क्रिय प्रशासन अधिकारी मंगलवाडी संकुलाच्या अधःपतनास जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. नगरपालिकेच्या कित्येक शाळांमध्ये पट इतका कमी झालाय की एका विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे. खोटा पट दाखवण्याची सर्व कसरत अतिरिक्त शिक्षकांना वाचवण्यासाठी केली जाते. यामागे मोठा आर्थिक व्यवहार असल्याचा संशय बळावत चालला आहे. 

अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी येणारी शासनाची ग्रॅंड हडप केली जाते. शासनाला सादर केलेल्या खोट्या अहवालामुळे शालेय पोषण आहार, युनिफॉर्म इत्यादींच्या माध्यमातून भ्रष्टाचार होतोय. मंगलवाडी संकुलातील गुणवंत शिक्षकांच्या झालेल्या बदल्या इतरांना चेतावणी होती. त्यामुळे शिक्षण समितीच्या कार्यालयात टेबलचा ड्रॉवर गरम पाकिटांनी भरलेला असतो.

नगरपालिकेत विचारणा केली असता मंगलवाडी संकुलातील चार गुणवंत शिक्षकांच्या बदल्या नेहरू नगर शाळेचा पट वाढवण्यासाठी केल्या. त्यामुळे या शाळेचा पट ४२ झाला असे सांगितले, मग या शिक्षकांना शिक्षा झाल्या सारखी वागणूक का दिली जाते? या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार का दिला गेला नाही? 

एक किलोमीटर परिक्षेत्रात येणाऱ्या पाच शाळांपैकी तीन शाळांचा पट ५० पेक्षा कमी असल्याने समायोजन का केले जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंगलवाडी संकुलातील तीन शाळांचे समायोजन झाले तरी १८ शिक्षकांची संख्या ८ वर येईल आणि शासनाचे दरमहा आठ लाख रुपये वाचतील. प्रशासन अधिकाऱ्याने शिक्षकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यांनी मंगलवाडी संकुलातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा तपासावा अशी मागणी समस्त पालक वर्गाकडून होत आहे. काही तक्रारदार लवकरच पुराव्यानिशी प्रशासन अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी लावावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच येथील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज देखील दाखल करण्यात आलेला आहे. त्यातून उघडकीस येणाऱ्या माहितीच्या आधारावर गैरप्रकार व शासनाची दिशाभूल करणाऱ्यांची आता चांगलीच कोंडी होणार असून ते कायद्याच्या कचाट्यात अडकले जाणार आहेत.

Popular posts from this blog