तळा नगरपंचायत बिनविरोधच्या अडचणीत वाढ; ग्रामस्थांच्या भूमिकेला तडा

तळा : संजय रिकामे

तळा नगरपंचायत निवडणुकीत भोईर वाडी  प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वसाधारण महिला या जागेसाठी बिनविरोध निवडून आणण्यासाठी ग्रामस्थांचे एकमत झाले होते या जागेसाठी भोईर वाडीचे सुपुत्र नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते चंद्रकांत भोरावकार यांच्या पत्नी सौ.अस्मिता भोरावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उमेदवारी देण्यात आली, मात्र ऐनवेळी  शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज आल्याने तळा नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत भोरवकर यांना आता निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. 

प्रभाग क्रं- ४ वरचा मोहल्लामध्ये सर्वसाधारण आरक्षण पडले आहे याठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी ही निवडणूक कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर न लढता अपक्ष म्हणून लढण्याचे ठरविण्यात आले गावकीचा उमेदवार म्हणून सर्वांनी सिराज खाचे यांना उमेदवारी दिली परंतु येथे देखील बंडखोरी करण्यात आली अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यात आलेले आहेत.या बंडखोरीला राष्ट्रवादी काँग्रेसचा छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे ज्या प्रभागात शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवारांचे बिनविरोध निकाल लागणार होते त्या ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकमेकांना अडचणीत आणले आहे. या सर्व घडामोडींमुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या ग्रामस्थांचा मात्र हिरमोड झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय सलोखा कायम राहावा, श्रम, वेळ आणि पैसा खर्च होऊ नये आणि तालुक्यात एक वेगळा आदर्श निर्माण व्हावा म्हणून  निवडणूक न लढता बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना ग्रामस्थांनी मांडली होती. त्यास सहमती देखील मिळाली होती. परंतु अचानक बंडखोरी होऊन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ग्रामस्थांच्या बिनविरोध भूमिकेला तडा गेला आहे.

प्रभाग क्रमांक ४ आणि प्रभाग क्रमांक १५ मध्ये   उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास तालुक्‍यात घडलेल्या या राजकीय घडामोडींमुळे समाज माध्यमातून उलटसुलट चर्चांना उधाण आले असून या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद आता अधिक ताणला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी काही काळ तणावही निर्माण होऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक १५ आणि प्रभाग क्रमांक ४ मधील पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचे अर्ज मागे घेऊन एकमेकांना सहकार्य करावे असा सुर चर्चेतून एकायला येत असून यासंदर्भातील निर्णय येणाऱ्या १३ तारखेलाच कळेल.प्रभाग क्रं- ७ जोगवाडी सर्वसाधारण जागेवरून ग्रामस्थांनी दिलेला शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश पोलेकर याची बिनविरोध निवड झाल्यात जमा असून येथे कोणीही बंडखोरी केलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाला यश आले आहे.  

प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेना पक्षाने घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळल्यानंतर शिवसेनेकडून माणगाव सत्र न्यायालयात अपील केलेले नाही. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँगेस उमेदवाराचा अर्ज वैद्य झाला असल्याने राष्ट्रवादी काँगेसने सुटकेचा श्वास सोडला आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये लढत होणार असून कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण कोण माघार घेणार याकडे उमेदवाराचा निकाल अवलंबून असून प्रत्येक प्रभागातील चित्र स्पष्ट होणार आहे.

Popular posts from this blog