कैलास पायगुडे मनगटावर घड्याळ बांधणार की शिवबंधन? याकडे सर्वांचे लक्ष
तळा : संजय रिकामे
भाजपा तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या पक्षातील प्रवेशाबाबत मनगटावर घड्याळ बांधणार की शिवबंधन याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजीनामा दिल्यानंतर पायगुडे यांची शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी भेट घेऊन चर्चा केल्याने ते शिवसेनेत जाणार याची चर्चा रंगली आहे. घोसाळकर यांच्या आधी कैलास पायगुडे हे आ. अनिकेत तटकरे यांनाही भेटले आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पायगुडे आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन बांधणार याकडे लक्ष लागले आहे. उद्योजक असलेले पायगुडे गेली ६ वर्षापासून भाजपा सोबत आहेत. या काळात त्यांच्या पत्नी सौ.ज्योती पायगुडे गिरणे ग्रामपंचातीच्या सरपंच झाल्या. त्या आधी २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकित त्यांच्या पत्नी सौ.ज्योती पायगुडे यांचा पराभव झाला तरीही ते राजकारणात सक्रिया राहीले आणि थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या गिरणे ग्रामपंचायतीवर त्यांनी कमळ फुलविले.कैलास पायगुडे यांचा चांगला जनसंपर्क असून प्रशासनावर चांगला वचक आहे. भाजपात प्रचंड नाराजी असलेले पायगुडे गेली काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषत: खा.सुनील तटकरे यांच्या संपर्कात होते. तटकरे-पायगुडे यांच्या भेटीत पक्ष प्रवेशाचीही चर्चा झाल्याची सर्वत्र संध्या सांगण्यात आले आहे. त्यामुळे पायगुडे या पुढच्या दिवसात कोणत्या नव्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता आहे.