नगरपंचायत निवडणुक, विविध प्रमाणपत्रांसह कर भरण्यासाठी इच्छुकांची धावपळ
तळा : संजय रिकामे
नगरपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची सुरुवात बुधवार (ता. 1) पासून झाली आहे. निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रांची जुळवा- जुळव करण्यासाठी इच्छूकांची धावपळ तर सुरुच झाली पण या निमित्ताने नगरपंचायतीला नळपट्टी व घरपट्टी मिळत आहे. कोरोनामुळे खडखडाट असलेल्या नगरपंचायतच्या तिजोरीत पैशाचा भरणा होत आहे.
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आरक्षणामुळे इच्छुकांचा भ्रमनिरास झाला असला तरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले कामाला लागले आहेत. नामांकन दाखल करण्यासाठी विविध प्रमाणपत्रासह नगरपंचायतीची थकबाकी, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, मालमत्ता कर वगळता इतर कराबाबत थकबाकी नसल्याचा व नगरपंचायतीचा ठेकेदार नसल्याचा स्वंयघोषणापत्र, गुन्हेगारी पार्श्वभुमी नसल्याचे प्रमाणपत्र, खर्चाचे हमीपत्र, १२ सप्टेंबर २००१ नंतर दोन पेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र यासह अन्य प्रमाणपत्राची गरज असल्याने राखीव प्रभागासह सर्वसाधारण गटातूनही निवडणूक लढवण्याची तयारी करत असणाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे.
निवडणूक लढवणाऱ्यासाठी नगरपंचायतीची अनेक प्रमाणपत्राची गरज असून या निमित्ताने नगरपंचायत अधिकारी वर्गाकडे संपर्क करुन कागदपत्रे काढून घेतले जात आहेत. गेल्या आठ नऊ महिण्यापासून कोरोना संसर्गामुळे जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला असल्याने विविध कर भरण्याकडे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले होते. आता मात्र लाँकडाऊन शिथिल झाले व व्यवहारही सुरळीत होत असल्याने नगरपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु झाला. त्यामुळे शहरातील पुढारी होण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी नगरपंचायतीमध्ये येवून नळपट्टी व घरपट्टी किती आहे याची विचारणा करण्याबरोबरच रक्कम भरुन बेबाकी प्रमाणपत्र घेत आहेत.
त्याचप्रमाणे गावच्या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा बिगूल वाजला असून ता. 1 डिसेंबरपासून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. कधी नव्हे ते यंदा गावचे कारभारी होण्यासाठी तरुण मंडळी इच्छूक असल्याने निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उमेदवारी दाखल करतांना निवडणूक लढवणाऱ्यासाठी लागणाऱ्या सर्वच कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे त्यामुळे कर भरुन कागदत्रांची जुळवाजुळव करण्याची खबरदारी घेतल्या जात आहे. एरवी सरपंच, ग्रामसेवक घरपट्टी व नळपट्टी भरण्यासाठी तगादा लावत असतांना कुणीच प्रतिसाद देत नाहीत पण निवडणुकीच्या निमित्ताने अनेकजण स्वतः होवून ग्रामपंचायतमध्ये येत असल्याने ग्रामपंचायतच्या तिजोऱ्या खुलणार आहेत. गावागातील इच्छुक कर भरण्यासाठी थेट ग्रामपंचायतमध्ये येत असल्याने कोरोना काळात अर्थिक अडचणीत आलेल्या ग्रामपंचायतींना आर्थिक मद्दतीचा हात मिळणार आहे.
1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 8 डिसेंबर 2021 रोजी होईल. मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.