तळा नगरपंचायत निवडणूकीसाठी आलेले 19 अर्ज बाद
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हरकती फेटाळल्या
तळा : संजय रिकामे
तळा नगर पंचायत निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज करण्यात आली. अधिकाऱ्यांनी एकूण 58 अर्जांची छाननी केली त्यातून 19 अर्ज अवैध ठरले आहेत छाननी मध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार निमशासकीय कर्मचारी असल्यामुळे निवडणुकीच्या नियमानुसार त्या उमेदवारी लढवू शकतात परंतु कुठल्याही राजकीय पक्षाचे चिन्ह घेऊन लढवू शकत नाहीत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला असल्याने यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेने हरकत घेतली. प्रभाग क्रमांक 15 मधील शिवसेनेच्या उमेदवार सुलोचना देवजी कटे यांनी उमेदवारी अर्ज भरताना सुचकाची सही फसवणूक करून घेतली असल्याचा आक्षेप घेत कटे यांच्या उमदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसने हरकत घेतली आहे. प्रभाग क्रमांक 9 आणि प्रभाग क्रमांक 15 मधील हरकतींवर निर्णय घेत निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी निवडणूक आयोगांच्या सूचनांचा आधार घेत दोन्ही हरकती फेटाळून लावल्या हे दोन्ही अर्ज वैद्य ठरविण्यात आले. निवडणुक निर्णय अधिकारी यांनी हरकत फेटाळली असली तरी शिवसेना पक्ष पुढे अपील करणार असल्याचे शहर प्रमुख राकेश वडके यांनी सांगितले. या अपिलामधे प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नगरपंचायतींमध्ये एकूण 17 जागांसाठी 77 उमेदवारी अर्ज दाखल होते. बुधवारी अर्ज छाननीमध्ये 19 अर्ज अवैध ठरले असून, 39 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत यामध्ये ना.मा.प्र.जागेसाठी एकूण 19 अर्ज दाखल झाले आहेत.अर्ज मागे घेण्यासाठी आज पासून 13.12.21 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याने कोण कोणासोबत समजोता करणार यावर उमेदवाराचा निकाल अवलंबून राहील मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.
निवडणुक निर्णय अधिकारी यांनी हरकत फेटाळली असली तरी त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो परंतु शिवसेना पक्ष पुढे अपील करणार असल्याचे शहर प्रमुख राकेश वडके यांनी सांगितले या अपिलामधे न्यायालय योग्य तो निर्णय देइल हा आम्हाला विश्वास आहे.
- राकेश वडके शिवसेना शहर प्रमुख