पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील पाटणूस, विळे या गावांना जोडणारी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधे पावसाळ्यात खूप मोठमोठे धबधबे वाहतात. यांतील बहुतांश धबधब्यांचे पाणी या नदीला येऊन मिळते म्हणून या नदीला प्रचंड प्रमाणात पूर येतो आणि ही नदी धोक्याची पातळी ओलांडते. या नदीवर सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडून यापूर्वी बांधण्यात आलेल्या पूलाची उंची तर कमी होतीच पण हा पूल अतिशय कमकुवत झाला होता आणि म्हणून या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. अनेक प्रसारमाध्यमांतून सुद्धा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. त्यामुळे सार्वजनिक विभागाकडून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले व लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी या पुलाचे काम सुरू करण्यात आले. परंतु लॉकडाऊन सुरू झाल्याने सहा महिन्यात पूर्ण होणाऱ्या पुलाच्या कामाला तब्बल दोन वर्ष लागली. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर पुलाच्या कामाला वेग येऊन अखेर पुलाचे काम पूर्ण झाले.
सा. बा. विभाग महाड, उप विभाग माणगांव यांच्या यांच्या माध्यमातून चॅनेल 78/100 विळे पाटणूस पुलाचे काम सुरू होते. अमृता कन्स्ट्रक्शन कंपनी. तालुका खेड, जि. रत्नागिरी यांच्या वतीने काम करणारे सब कॉन्ट्रॅक्टर एस. एम. चव्हाण व श्रीधर सपकाळ यांनी काम पूर्ण केले. पुलावरून वाहतूक सुरू झाली असली तरी पुलाचे उदघाट्न होणे बाकी आहे. त्यामुळे उदघाटनाला कोणते मंत्री येतात याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे.