नागोठणे परिसरातील बालसई येथे भगतगिरी बुवाबाजी
अंधश्रद्धेने गुरफटलेल्या लोकांची होतेय लुटमार!
रोहा (समीर बामुगडे) : जुन्या रूढी परंपरा मोडीत काढत आपण नव्या युगात पदार्पण केलेले आहे. परंतु आजची स्थिती पाहता आपला समाज आज देखील अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहात गुरफटत चालल्याचे दिसून येत आहे. आजच्या स्थितीत अंधश्रद्धेचे अनेक प्रकार आपल्या सभोवताली घडताना दिसत असतात. देवाचा कोप, भूत, गुप्तधन, चमत्कार, मंत्र, अवतार, पूर्वजन्म-पुनर्जन्म, अपशकुन, करणी यांसारखे अंधश्रद्धेचे प्रकार अनेक ठिकाणी पाहण्यात आलेले आहेत. या अंधश्रद्धेमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत. तरी अंधश्रद्धेचा चष्मा फेकून प्रत्येकाने सत्य परिस्थितीला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे!
अंधश्रद्धेचा असाच एक प्रकार नागोठणे परिसरातील बालसई येथे दिसून आलेला आहे. येथे भगतगिरी-बुवाबाजीचे प्रकार घडत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखवून भगतगिरी द्वारे त्यांची संकटातून सुटका करण्याचे आमीष दाखवून भोंदू बाबांनी त्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू ठेवल्याचे उघडकीस आलेले आहे. येथे लोकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून १०० ते ५०० रूपये घेतले जातात आणि एखाद्या समस्येवर भगतगिरीद्वारे तोडगा काढण्यासाठी ५ ते १० हजार रूपयांची मागणी करून लोकांची लुबाडणूक केली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याकडे तातडीने लक्ष देऊन हा घृणास्पद प्रकार थांबवावा अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.