रिलायन्स कंपनी विरोधातील आंदोलन चिघळले!
आंदोलनकर्त्यांची पोलीसांकडून धरपकड
रोहा : समीर बामुगडे
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला.
कंपनी पासून २०० मीटर अंतरापर्यंत निर्बंध असल्याने नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कडसुरे येथे जनआंदोलन छेडण्यात आले. यावेळी जमावबंदीचा आदेश मोडल्याने पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रोह्यातील मातोश्री मंगल कार्यालयात ठेवले आहे. मंगळवारी सकाळी त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ४० पुरुष आणि ३० महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, रोह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मातोश्री मंगल कार्यालयाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.