माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास निडी तर्फे अष्टमी ग्रामसेवक डी. ए. भंडारे यांच्याकडून टाळाटाळ!
राज्य माहिती आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
ग्रामसेवक डी. ए. भंडारे यांच्यावर कारवाईची मागणी
रोहा : समीर बामुगडेराज्य माहिती आयुक्तांचे आदेश असतानाही माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ करणारे रोहा तालुक्यातील निडी तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीचे तत्कालिन ग्रामसेवक श्रीमती डी. ए. भंडारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रोहा तालुक्यातील खारापटी येथील मनोहर तुकाराम चोरगे यांनी राज्य माहिती आयोगाकडे केलेल्या तक्रारीद्वारे केली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रोहा तालुक्यातील खारापटी येथील मनोहर तुकाराम चोरगे यांनी ग्रुप ग्रामपंचायत निडी तर्फे अष्टमी येथील जनमाहिती अधिकारी तथा ग्रामसेवक श्रीमती डी. ए. भंडारे यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये १४ वा वित्त आयोग संदर्भात सन २०१५ ते २०१८ या वर्षांतील कमिटीच्या झालेल्या मिटींग व त्यामध्ये झालेले निर्णय तसेच २) कैशबुक ३) व्हाऊचर फाईल ४) बॅक स्टेटमेंट ५) १४ वा वित्त आयोग बँक ऑफ इंडिया पासबुक ६) १४ वा वित्त आयोगाची झालेली कामे व ठेकेदारांची नावे व पत्ते ७) कामाचे व्हॅल्यूऐशन ८) सन २०१५ ते २०१८ या वर्षातील मासिक सभेचे इतीवृत्त ९) कमिटीमध्ये असलेल्या सदस्यांची नावे वगैरे माहिती रीतसर अर्ज करून मागितली होती. तथापी त्यांनी सदर माहिती मुदतीत दिली नाही. त्यामुळे मनोहर चोरगे यांनी प्रथम अपिलीय अधिकारी श्री. एम. जी. फरतडे, विस्तार अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे प्रथम अपिल दाखल केले होते. त्यांनी आदेश देवूनही जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक श्रीमती डी. ए. भंडारे यांनी सदर माहिती दिली नाही. त्यानंतर मनोहर चोरगे यांनी यासंदर्भात राज्य माहिती आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यानंतर चौकशी होऊन दि. १६/०१/२०२० रोजी राज्य माहिती आयुक्तांनी निकाल देवून जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक श्रीमती डि. ए. भंडारे यांना सदर माहिती १५ दिवसात समक्ष/नोंदणीकृत टपालाने निःशुल्क पूरवणे बाबत आदेश केले.
परंतु वरील प्रमाणे आदेश होवून आजपर्यंत सदर जन माहिती अधिकारी यांनी मनोहर चोरगे यांना सदर माहिती पुरविलेली नाही. परिणामी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या तसेच पदाचा दुरूपयोग करणाऱ्या तत्कालिन ग्रामसेवक डी. ए. भंडारे यांच्यावर कडक कारवाई करावी अशी तक्रार खारापटी येथील मनोहर तुकाराम चोरगे यांनी राज्य माहिती आयोगाकडे केली आहे.