भगतगिरी पुन्हा सुरू! बालसई येथून बुवा पळाले, खांब येथे बस्तान बसविले
खांब येथे कॅनॉलच्या बाजूला भगतगिरीचा अड्डा, अंधश्रद्धेने गुरफटलेल्या लोकांची होतेय लुटमार!
गुरूवारी भगतगिरीचा दरबार भरणार
धाटाव/रोहा : किरण मोरे
लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारची भिती दाखवून भगतगिरी द्वारे त्यांची संकटातून सुटका करण्याचे आमीष दाखवून भोंदू बाबांनी त्यांची आर्थिक लुबाडणूक सुरू ठेवली होती. आधी ही भगतगिरी नागोठणे परिसरातील बालसई येथे सुरू होती. त्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत जोरदार आवाज उठविल्यामुळे येथील भोंदूबुवांची बालसईमधून पळापळ झाली. त्यानंतर भगतगिरीचा धंदा पुन्हा खांब येथे सुरू झालेला आहे.
येथे लोकांचा अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून ५०० रूपये घेतले जातात आणि एखाद्या समस्येवर भगतगिरीद्वारे तोडगा काढण्यासाठी ५ ते १० हजार आणि एखादा 'श्रीमंत बकरा' सापडल्यास ५० हजारांची मागणी करून लोकांची लुबाडणूक केली जात आहे. सध्या रोहा तालुक्यातील खांब येथे कॅनॉलच्या बाजूलाच भगतगिरीचा धंदा सुरू झालेला असून दर गुरूवारी येथे भगतगिरीचा दरबार भरतो. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकाराकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.