२५० कोटींच्या राज्य मार्गावर काम करतात बालकामगार, शिक्षण घेण्याच्या वयात बालकांना रस्त्याच्या कामावर जुंपले! 

बाल कामगार विरोधी कायदा कागदावरच राहण्याची भीती

आशिष कंस्ट्रक्शन्स कंपनीवर कारवाई करा : शेकाप कार्यकर्ते देवचंद्र म्हात्रे यांच्याकडून कारवाईची मागणी

धाटाव/रोहा : किरण मोरे

"बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा!" असे बालपणाबद्दल नेहमीच म्हटले जाते. कारण "बालपण" हा शब्द जरी ऐकला तर खेळणे, बागडणे, मौजमजा हे प्रकार सहज डोळ्यासमोर येतात. परंतु आजच्या पिढीतील धक्कादायक प्रकार पाहता बालकांकडून त्यांचे बालपण हिरावून घेतले जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यांच्या हातात पाटी, पेन्सिल देण्याऐवजी त्यांना कामावर जुंपले जात आहे! बाल कामगार रोखण्यासाठी सरकारने कायदा निर्माण केला, परंतु हा कायदा कठोर अंमलबजावणीच्या आभावामुळे केवळ कागदावरच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असाच एक निंदनीय व धक्कादायक प्रकार दिसून आलेला आहे. येथे बालमजूरीचे भयाण वास्तव समोर आलेले आहे. येथे कोवळ्या वयातील मुलांना रस्त्याच्या कामावर जुंपल्याचे स्पष्टपणे दिसून आलेले आहे. येथे राज्य मार्ग-९३ चे काम सुरू आहे. या मार्गाच्या एका एका टप्प्यात बी.एस.एन.एल. च्या कार्यालयानजीक रस्त्यावर लहान बालकांकडून काम करून घेतले जात असल्याचे दिसून आलेले आहे. या रस्त्याचे काम आशिष कंस्ट्रक्शन्स या कंपनीने घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. परिणामी या "आशिष कंस्ट्रक्शन" विरूद्ध बाल कामगार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी शेकाप कार्यकर्ते देवचंद्र म्हात्रे यांनी केली आहे. 

१२ जून आपण एकीकडे बाल कामगारविरोधी दिन पाळतो. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस १४ नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवशीच फक्त बाल कामगारांविषयी फक्त भाषण ठोकले जाते पण कुणीही याबाबत गांभीर्याने विचार करीत नाही. आज गरज आहे ती केवळ कठोर अंमलबजावणीची!

Popular posts from this blog