शिहू येथील बहिरेश्वर जोगेश्वरी मंदिरात दीपोत्सव साजरा
मंजुळा म्हात्रे : प्रतिनिधी
लक्ष्मीपूजनचे औचित्य साधून दिनांक ४ नोव्हेंबर रोजी बहिरेश्वर जोगेश्वरी मंदिरात प्रथमच दीपोत्सव साजरा करण्यात आला.
संपूर्ण मंदिर दिव्यांच्या रोषणाईने झगमगून उठला होता. दिवा ज्याला मांगल्याचे प्रतिक समजलं जात, विजयाचे प्रतिक समजलं जात म्हणून पुर्ण मंदिर दिव्यांनी सजला होता. या दीपोत्सवात बहिरेश्वर जोगेश्वरी मातेला साकडं घालण्यात आलं की, कोरोनाचे जे अंधार रुपी साम्राज्य या जगावर पसरले आहे ते दूर करून सर्वत्र प्रकाशाचे साम्राज्य निर्माण करून असंख्य घरातील अंधार दूर कर, अशी यावेळी प्रार्थना करण्यात आली.
या वेळी शिहू येथील तरुणांनी जवळजवळ १००० दिव्यांनी मंदिराचा गाभारा व पूर्ण परिसर प्रकाशमय करून टाकला होता.गावातील तरुण समाजसेवा ग्रुप, परमार्थ ग्रुप एक हात मदतीचा यांच्या संकल्पनेतून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. गावाचा एकोपा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने अशा संकल्पना राबविण्यात येत असल्याचे यावेळी गावातील तरुणांनी सांगितले. या दीपोत्सवासाठी गावातील असंख्य नागरिक, महिला, तरुण व तरुणी उपस्थित होत्या.