रोहा तालुक्यात कंपन्यांच्या प्रदूषणाचे तांडव सुरू! 

कंपन्यांच्या केमिकलयुक्त सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदुषित 

मासे मृत होण्याचा धक्कादायक प्रकार, मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता! 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिवंत आहेत, की मेलेत? : नागरिकांचा सवाल!

चणेरा/रोहा : रोहित कडू 

रोहा तालुक्यातील गोफण-कुंभोशी परिसरातील मच्छीमार बांधव कुंडलीका नदीमध्ये पारंपारीक पध्दतीने मासेमारीचा व्यवसाय करीत आहेत. परंतु धाटाव एम.आय.डी.सी. मधील कंपन्यांनी तर प्रदूषणाचे तांडव सुरू केलेले असून कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त प्रदुषित सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदुषित होऊ लागले असून या केमिकलयुक्त दुषित पाण्यामुळे कुंडलिका नदीतील मासे मृत होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी झोपा काढतात का? प्रदूषण पसरविणाऱ्या कंपन्या या अधिकाऱ्यांना काही घबाड तर पोहोचवत नाही ना? अथवा, येथील कंपन्या प्रदूषण निसंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पोसत तर नाही ना? तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिवंत आहेत, की मेलेत? अशी चर्चा या परिसरात ऐकायला मिळत आहे. 

कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त दुषित पाण्यामुळे कुंडलिका नदितील मासे मृत होण्याचा धक्कादायक प्रकार वारंवार घडत असल्यामुळे मच्छीमार बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटूंबांंवर उपासमारीची वेळ आली आहे. 

तरी व्यवस्थापक सी.ई.टी.पी. केंद्र धाटाव यांनी कुंडलिका नदीमध्ये केमिकलयुक्त दुषित सांडपाण्यामुळे मृत झालेल्या माशांबाबत तसेच मच्छीमार बांधवांच्या झालेल्या नुकसानी बाबत तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत पहाणी करून तातडीने पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे. याप्रकरणी गोफण-कुंभोशी गावातील मारूती वाघमारे, नारायण भोई, योगेश भोई, सुरेश भोई, विलास घाग, रविंद्र भोई यांच्यासह या परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री आदिती तटकरे, तहसिलदार रोहा, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहा, पोलीस ठाणे रोहा, सी.ई.टी.पी. केंद्र धाटाव यांच्याकडे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

Popular posts from this blog