तांबडी ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराची चौकशी, मनसेच्या दणक्याने प्रशासनाला जाग
रोहा : समीर बामुगडे
तालुक्यातील तांबडी ग्रामपंचायती मध्ये शेतकरी अवजार खरेदी सह अन्य सर्वच बाबतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामसभेत ग्रामस्थांनी केला होता. २२ ऑक्टोंबर रोजी झालेल्या या ग्रामसभेत ग्रामसेवकाला या बाबत ग्रामस्थांनी धारेवर धरला असता त्याने सर्व वस्तुस्थिती मान्य केली होती. त्यासंबंधी तक्रार अर्ज रोहा गटविकास अधिकारी यांचे कडे करण्यात आला होता. मात्र त्याची कोणतीही दखल प्रशासन घेत नसल्याचे जाणवताच ग्रामस्थांनी मनसे जिल्हा सचिव अमोल पेणकर, तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे यांची भेट घेतली. सर्व वस्तुस्थिती जाणून घेत प्रभारी गटविकास अधिकारी पंडीत राठोड यांची भेट घेत मनसे नेत्यांनी दिरंगाई बाबतप्रशासनास धारेवर धरले. याची दखल घेत आज १८ नोव्हेंबर रोजी विस्तार अधिकारी महारुद्र फडतरे तांबडी ग्रामपंचायत मध्ये याबाबत चौकशी करणार आहेत. ग्रामस्थांनी तक्रार करून महिना होत आल्यानंतर मनसेच्या दणक्या नंतर याबाबत आता उशिरा का होईना प्रशासनास जाग आली आहे.
रोहा तालुक्यातील बहुतांशी सर्वच ग्रामपंचायती मध्ये सत्ताधारी व ग्रामसेवक व पंचायत समिती मधील अधिकारी यांचे संगनमताने भ्रष्टाचारी कारभाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. यामध्येच तांबडी ग्रामपंचायती मध्येही ग्रामसेवकाने शेतकऱ्यांना देण्यात येणारी अवजारे व अन्य वस्तू खरेदी केल्या. मात्र त्यांचे कोणत्याही प्रकारे वाटप पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना केले नाही. येथील ग्रामस्थ मनोहर विठ्ठल गोरे यांच्यासह उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी २२ ऑक्टोंबर रोजी कोरोना प्रादुर्भाव कमी होताच झालेल्या प्रत्यक्ष प्रथमच ग्रामसभेत या सर्व प्रकारा बाबत ग्रामसेवक थळे यांना जाब विचारला. आपल्या ग्रामपंचायती मध्ये ग्रामसेवक भ्रष्ट कारभार करत असल्याचे निदर्शनास येताच जागृत ग्रामस्थांनी रोहा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे कडे तक्रार अर्ज करत कारवाईची मागणी केली. २५ ऑक्टोबर रोजी मनोहर गोरे यांनी हा तक्रार अर्ज रोहा पंचायत समिती मध्ये केला. मात्र यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे तक्रारदार व ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोहा कार्यलयात येत आपली समस्या मांडली. त्याची दखल घेत १५ नोव्हेंबर रोजी मनसे रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांचे नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष अक्षय रटाटे, शहराध्यक्ष मंगेश रावकर व ग्रामस्थ यांनी प्रभारी गटविकास अधिकारी पंडीत राठोड यांची भेट घेतली. त्यावेळी या अर्जाबाबत आपल्याला आजच माहिती मिळाली असे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी सांगितल्या मुळे येथील प्रशासन झोपलेल आहे? की झोपेच सोंग घेतेय असा सवाल मनसे पदाधिकाऱ्यांनी करत चांगलेच धारेवर धरले. मनसेचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत गटविकास अधिकारी राठोड यांनी दोन दिवसांत याबाबत चौकशी लावतो असे आश्वासन ग्रामस्थ व मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर विस्तार अधिकारी स्वतः तांबडी ग्रामपंचायत मध्ये जात येथील सर्व भ्रष्ट कारभाराची चौकशी करत आहेत. या चौकशी मुळे सर्व ग्रामसेवकांचे धाबे दणाणले असून भ्रष्ट ग्रामसेवकावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.