महाराष्ट्र नवनिर्माण सेना माणगांव तालुका अध्यक्ष पदावर प्रतिक रहाटे यांची नियुक्ती
माणगांव : प्रमोद जाधव
दक्षिण रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नावनियुक्त्या दिनांक ११ नोव्हेंबर रोजी करण्यात आल्या. यामध्ये माणगांव तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तरुण तडफदार युवा व होतकरू नेतृत्व व ज्यांनी बरीच वर्षे पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली असे प्रतिक राजेंद्र रहाटे यांची माणगांव तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असून तशा प्रकारचे नियुक्तीपत्र देखील त्यांना देण्यात आले आहे.
सदर नियुक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याचे प्रतिक रहाटे यांनी सांगितले आहे.
तसेच पक्षाच्या मिळालेल्या या पदाचा वापर आपण पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात निष्ठेने राबविणार, तसेच आपल्या कामात कसल्याही प्रकारची कुचराई असणार नाही व आपल्या सहकार्यातून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही. मराठी बांधवांना भगिनींनी आणि मातांना अभिमान वाटेल असे काम करणार असल्याचे मत माणगांव नवनिर्वाचित मनसे तालुका अध्यक्ष प्रतीक रहाटे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.