बहुप्रतीक्षित रेल्वे क्रॉसिंग पुलाची खासदार सुनिल तटकरे यांनी रेल्वे व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह केली पाहणी

रोह्याचा खासदार लोकसभेत पोहोचल्यामुळे चाळीस वर्षांचा यातनामय प्रवास संपणार, रोहेकरांमध्ये समाधान!

रोहा : रविना मालुसरे

बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या कोकण सुपुत्रांच्या अविरत परिश्रमातून कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरले. उंच-सखल प्रदेश, नद्या, सागरी किनारे, डोंगर अशा भौगोलिक परिस्थितीपुढे हार न मानता अभियंत्यांच्या अथक परिश्रमातून अखेर जगाला हेवा वाटावा असा कोकण रेल्वेचा ऐतिहासिक प्रवास सुरु झाला. रोहा-दिवा हा रेल्वेमार्ग सुरू होऊन आता जवळपास चाळीस वर्षे होत आली आहेत. तत्कालीन पध्दतीने रोह्याला जोडणाऱ्या रस्त्यांवर अष्टमी व पडम असे दोन रेल्वे फाटक टाकले गेले.

सुरुवातीला लोहमार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या मर्यादित होती. तसेच रस्ते वाहतूकही नगण्य. त्यामुळे या फाटकांचा फारसा त्रास होत नसे. नंतर मात्र कोकण रेल्वे रोह्यावरून थेट मंगलोरला पोहोचली आणि या लोहमार्गावरून गाड्यांची प्रचंड वर्दळ सुरु झाली. तर दुसरीकडे रस्त्यावर सुद्धा वाहनांची संख्या वाढली. त्यामुळे रेल्वे फाटकावर गेट उघडे असण्यापेक्षा जास्त वेळ बंद असतात. सहाजिकच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता.

ह्या रस्त्यावरून जाणारे औद्योगिक क्षेत्रातील कामगार अनेकदा फाटक पडल्यामुळे वेळेवर कारखान्यात पोहोचू शकले नाहीत.तर कुठे आजारी रुग्ण,गरोदर स्त्रिया यांना सुद्धा प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या. वेळ व इंधन यांचा ही प्रचंड अपव्यय होत होता.ही समस्या एक दोन नव्हे तर जवळपास चाळीस वर्षे रोहेकरांना सतावत होती. रेल्वे फाटक क्रॉसिंगची समस्या आता  जीवघेणी झाली होती. बॅरिस्टर नाथ पै, मधुभाई  दंडवते यांचा वारसा लाभलेले कोकणचे सुपुत्र सुनिल तटकरे हे पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले. त्यांनी रोहेकरांच्या ह्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू केली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केले. त्यास राज्य सरकारच्या शिफारशी जोडल्या. जणु काही अनेक वर्षांच्या जीवघेण्या समस्येतुन रोहेकरांना सोडविण्याचा चंगच ह्या सजग लोकप्रतिनिधीने बांधला होता.

अखेर त्याचे फलित मिळाले.अष्टमी व पडम येथील रेल्वे क्रॉसिंग पुलाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली. त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी खासदार सुनिल तटकरे यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह रेल्वे क्रॉसिंग पुलाच्या जागेची पाहणी केली. वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा करून आणलेल्या ह्या रेल्वे क्राॕसिंग पुलाच्या उभारणीसाठी खासदार सुनिल तटकरे जातीने लक्ष ठेवून आहेत.लवकरच त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊन जलदगतीने काम पूर्ण करून पडम व अष्टमी असे दोन्ही  रेल्वे क्राॕसिंग पुल नागरिकांच्या सेवेत दाखल होतील असा दृढ विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. तर दुसरीकडे समस्त रोहेकरांना या ऐतिहासिक क्षणाची प्रतिक्षा लागली आहे.खासदार सुनिल तटकरे यांनी केलेल्या या अभूतपूर्व कामाबद्दल रोहेकरांमधून अभिमान आणि आनंदही व्यक्त होत आहे.

Popular posts from this blog