रोहा-चणेरा परिसरात गुरे चोरणाऱ्या टोळीची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!
चणेरा/रोहा : रोहित कडू
रोहा चणेरा भागात मागील काही दिवसांपासून गुरे चोरणारी टोळी संशयास्पद रितीने फिरत असल्याचे आढळून आलले आहे. तर अनेक दिवसापासून गुरे चोरीला जाण्याच्या घटना देखील घडत आहेत. ही गुरे चोरणारी टोळी हत्यारबंद असल्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याने या परिसरात या टोळीची दहशत निर्माण झालेला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुरे चोरणाऱ्या ह्या टोळीची एक विशीष्ट पद्धत समोर आलेली आहे. ही टोळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुरांना गुंगीचे औषध देऊन गुरे पळवून नेल्याचे अनेक प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. रोहा तालुक्यातील भागीर्थीखार येथील रहिवाशी नथुराम म्हात्रे व भास्कर मोरे यांची गाय व बैल चोरीला गेल्याचा प्रकार या परिसरात घडला आहे. भागीर्थीखार येथील ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून ६ नोव्हेंबर २०२१ सकाळी पहाटे ३:४५ वा गुरे चोरून नेणाऱ्या टोळीला ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ही टोळी सावधानतेने ग्रामस्थांच्या हातून निसटून पळून गेली असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. त्यामुळे रोहा-चणेरा परिसरातील नागरिकांनी या टोळीपासून सतर्क राहणे गरजेचे आहे.