बोर्ले येथील अल्पवयीन मुलाच्या अपहरणासाठी वापरलेली मोटारसायकल सापडली रोहा एस टी स्थानकात
रोहा (समीर बामुगडे) : माणगांव तालुक्यात मोर्बे ग्रामपंचायत मधील बोर्ले गावातील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलाचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल रोहा एस टी स्टँड मध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. या अपहरणाचा माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वा. च्या सुमारास माणगांव तालुक्यातील बोर्ले गावातील फिर्यादी सुनिल बारीकराव यादव यांच्या घरासमोरील अंगणातून आरोपी संतोष अशोक यादव, वय ३० वर्ष, रा. बोर्ले, ता. माणगांव याने त्यांच्या लाल काळ्या रंगाच्या होंडा शाईन गाडी क्र. एम. एच. ०६ बी एक्स ८८२४ वरून फेरफटका मारण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलगा कु. रुद्र अरुण यादव, वय २ वर्ष ३ महिने याला त्याच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन पालकांच्या संमतीशिवाय जबरदस्तीने पळवून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एम. एच. ०६ बी एक्स ८८२४ ही 27ऑक्टोंबर रोजी सायंकाळी रोहा शहरातील एस टी स्टँड मध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.
रोहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह एस टी स्टँड मध्ये तपास यंत्रणा सूरू केली, यावेळी रायगड पोलिस गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, माणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी यांनी रोहा मध्ये संयुक्तरीत्या तपास सुरू केला. आरोपी संतोष यादव याने बोर्ले गावातून लहान मुलाचे अपहरण करून तो थेट रोहामध्ये आला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संतोष याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल रोहा एस टी स्टँड मध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे दिली. मी उद्या गाडी घेण्यासाठी येणार आहे असे सांगून संतोषने गाडीची चावी देऊन तेथून धूम ठोकली. तो लहान मुलाचे अपहरण करून तो थेट रोहा मध्ये आला असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोहा एस टी स्टँड मध्ये गाडी ठेवण्यासाठी संतोष आला असता त्याच्या सोबत अपहरण करण्यात आलेला लहान मुलगा नसल्याचे प्रथम दर्शनी तपासात पुढे आले आहे. त्यामुळे पोलिसांसह पालकांची चिंता वाढली आहे. अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा रुद्र अरुण यादव, हा अवघ्या २ वर्षाचा आहे.
त्याचा रंग गोरा, केस लहान, उंची साधारण २ फूट, अंगात पिवळ्या रंगाचा बाह्या नसलेला टीशर्ट, निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, गळ्यामध्ये नऊ रंगी दोरा त्यास साईबाबांचे सोन्याचे लॉकेट आहे.
या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस स्टेशन मध्ये भा. दं. वि. कलम ३६३ प्रमाणे करण्यात आली आहे.
माणगांव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वराळे, रोहा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी शर्तीची बाजी लावून तपास करत आहेत.