तळा तालुक्यात अवैध मटका जोमात, जागा बदलून मटक्याचे अड्डे सुरू!
रायगड (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात मटका व्यवसाय अगदी जोमात सुरू आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकानी कारवाई करून देखील अजूनही तळा शहरात मटक्याचे ऑफिस बदलून वेगळ्या जागी तेच ऑफिस चालू करून तळा तालुक्यातील मटका जोमात सुरू असल्याचे चित्र तळा बस स्थानक परिसरात दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील तळा, मुरुड पोयनाड या शहरात बेकायदा मटका जुगार सुरू असल्याचे प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी अनेक वेळा पोलीस खात्याच्या निदर्शनास आणून देखील पोलीस खात्याकडून काही ठिकाणी कारवाई होत नाही किंवा काही ठिकाणी कारवाईला जाणुन बुजून दिरंगाई केली जात आहे असे चित्र दिसत आहे.
रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील परिस्थिती मात्र विचित्रच आहे. पत्रकारांनी चालू असलेले मटका जुगार अड्डे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले की, एका जागेवरून हे मटका व्यवसायिक धंद्याची जागा बदलतात व कल्याण नावाचा मटका चालवतात. सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी ह्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून देखील तळा पोलीस कारवाई करण्यास का धजत नाहीत? की कुणाचा वरदहस्त ह्या मटका व्यावसायिकांवर असा गंभीर प्रश्न देखील तळा तालुक्यातील सुजाण नागरिकांना पडला आहे. रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत तळा तालुका हा आर्थिकदृष्ट्या तितकासा संपन्न नाही आणि त्यातच हे अवैध धंदे यामध्ये बराचसा सर्वसामान्य वर्ग अजून गरीब होत चालला आहे.आणि या मटका व्यावसायिकांच्या तुंबड्या भरल्या जात आहेत.पोलिस जर कारवाई करणार नसतील तर तळा तालुक्यातील संतप्त महिलावर्ग तळा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणार असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.आता तळा पोलीस कोणत्या प्रकारची कारवाई करणार हे पहाणे औस्तुक्याचे ठरणार आहे.