रोहामध्ये ऑनलाईन जुगार तेजीत, तरूण पीढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर!
धाटाव/रोहा (किरण मोरे) : रोहामध्ये सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन जुगार राजरोसपणे सुरू असून पोलीस प्रशासनाने हे तातडीने बंद करण्याची कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे.
सध्या रोहे शहरातील धावीर मार्केट, रायकर पार्क, खैरकर हॉस्पिटलच्या बाजूला आणि नवरत्न हॉटेलच्या परिसरात असे एकूण ४ ठिकाणी ऑनलाईन जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असून या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरूण पीढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत.
अनेक तरूण व वयोवृद्ध माणसे त्यांचा महिन्याचा पगार या जुगारामध्येच खर्च करीत असून अनेकांच्या कुटूंबात वाद-भांडणे सुरू असल्याचे दिसत आहे. या ऑनलाईन जुगारामध्ये एक वेळा योगायोगाने जिंकलेली व्यक्ती पुन्हा-पुन्हा जिंकण्याच्या आशेने आपली मेहनतीची कमाई वारंवार यामध्येच घालवित असल्याचे दिसत आहे. या जुगाराच्या नादाने अनेक जुगारवेड्या तरूणांनी घरातील महिलांचे दागिने विकल्याचे धक्कादायक प्रकार देखील घडलेले आहेत. सदरचे ऑनलाईन जुगाराचे धंदे या परिसरात आजपर्यंत कायम सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा व सुव्यस्था आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व महिला वर्गासमोर उभा आहे.