विळे, पाटणूस भिरा परिसरात परतीच्या पावसाचे थैमान 

वीज कोसळल्याने दोन बैलांचा मृत्यू, तर महिला किरकोळ जखमी 

पाटणूस येथे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने अर्धे गाव अंधारात 

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : माणगांव तालुक्यातील विळे, पाटणूस भिरा परिसरात गेले चार दिवस परतीच्या पावसाने थैमान घातले असून दररोज सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत आहे. दिवसा कमालीची ऑक्टोबर हिट तर सायंकाळी विजेचा लखलखाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस यामुळे सायंकाळी शक्यतो कुणीही घराबाहेर पडत नाही. 

विळे धनगर वाडी येथील एक महिला सौ. जनाबाई प्रकाश बावधाने ही शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती. सायंकाळी साधारण पाच सहाच्या दरम्यान सदर महिला गुरे घेऊन घरी निघाली होती त्याच दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली वीजा चमकू लागल्या आणि नेमके त्याचवेळी एक विजेचा गोळा महिलेच्या दिशेने आला आणि एकच स्फ़ोट झाला. त्या स्फोटाच्या आवाजाने महिला बेशुद्ध पडली, परंतु विजेचा झटका जबर बसल्याने मात्र महिलेच्या सोबत असणारे दोन बैल मात्र जागीच गतप्राण झाले. महिलेच्या सोबत असणाऱ्या तिच्या सात आठ वर्ष्याच्या मुलाने आरडा ओरडा केल्याने ग्रामस्थ धावले व त्यांनी बेशुद्ध महिलेला सुरक्षित घरी नेले. सदर घटनेची खबर मिळताच ग्रामपंचायत विळे येथील सरपंच गजानन मोहिते, उपसरपंच मनोहर धामुनसे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी आगे, कोतवाल गोविंद गुळंबे यांनी रितसर पंचनामा करून सदर प्रकरणाची तपासणी केली व नैसर्गिक आपत्ती म्हणून नोंद केली आहे. शेतकरी प्रकाश बावधाने यास नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. 

पाटणूस येथे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने अर्धे गाव दोन दिवस अंधारात असून महावितरणकडून त्यांचे कर्मचारी खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. विळे, पाटणूस भिरा परिसरात अजूनही दररोज सायंकाळी पाऊस अधून मधून जोरदार पाऊस पडत असून वीजही वारंवार खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झल्याने नागरिक हैराण झाले आहेत.  आतापर्यंत या परिसरात 4540 मी. मी. इतकी पावसाची नोंद झाली आहे.

Popular posts from this blog