क्लॅरियंट कंपनीत येणाऱ्या वाहनांची एमआयडीसी मार्गावर अवैध पार्कींग!
धाटाव/रोहा (किरण मोरे) : धाटाव औद्योगिक परिसरात वाहतूकीच्या मार्गावर क्लॅरियंट कंपनीत येणारी वाहने अवैधरित्या पार्क केली जात असल्याने या वाहनांविरूद्ध व कंपनीविरूद्ध तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
क्लॅरियंट कंपनीने वाहनांसाठी पार्कींगती व्यवस्था न केल्याने या कंपनीत येणारी मोठमोठी वाहने वाहतूकीच्या मार्गावर अवैधरित्या पार्क केली जात आहेत. विशेष म्हणजे हा रस्ता वाहतूकीसाठी असून या रस्त्यावरून रोठ बुद्रूक, महादेववाडी, मलखंडवाडी, तळाघर, वाशी, बोरघर, निवी, धाटाव या परिसरातील, नागरिक, शालेय विद्यार्थी यांची ये-जा सुरू असते. तसेच वाहनांची वाहतूक सुरू असते.
या अवैध पार्कींगमुळे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असून येथे अपघात किंवा अन्य दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या अवैध पार्कींगमुळे कोणतीही दुर्घटना अथवा अपघात घडल्यास त्यास क्लॅरियंट कंपनीच जबाबदार राहील! त्यामुळे क्लॅरियंट कंपनीमध्ये येणाऱ्या या वाहनांविरूद्ध व कंपनीविरूद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मोरे यांनी केली आहे.