ताम्हिणी घाटाने घेतला मोकळा श्वास! वाहतूक पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी

पाटणूस/माणगांव (आरती म्हामुणकर) : मुंबई व पुणे वरून ताम्हिणी मार्गे कोकणामध्ये बारा महिने मोठया प्रमाणात पर्यटक  येत असतात. तसेच ताम्हिणी घाटाच्या पायथ्याला मोठी औद्योगिक वसाहत असल्याने ताम्हिणी घाटात वाहनांची वर्दळ कायमच असते घाटामध्ये चढ-उतार नागमोडी वळणे असल्याने वारंवार अपघात होत असतात. यामध्ये अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळा आला की रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे वाढतात. त्यामुळे वाहन चालकांना झाडांच्या वाढलेल्या फांद्या व साईड पट्टीवर वाढलेले गवत यामुळे समोरून येणारी वाहने नीट दिसून येत नाहीत व चढ-उतार वळणे असल्याने वाहनावर ताबा मिळवणे अवघड होऊन जाते. त्यामुळे बऱ्याच वेळा अपघात होत असतात. याचीच दखल घेत महाड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलीसांनी ताम्हिणी घाटातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडांच्या फांद्या तसेच साईड पट्टीवरील वाढलेले गवत जेसीबीच्या सह्याने काढून रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. 

तसेच ताम्हिणी घाटामधील ब्लॅक स्पॉट वर खडी माती टाकून रस्ता वाहतुकीस चांगला बनविण्यात आला आहे. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल आणि  वाहन चालकांना सुखाचा प्रवास होण्यास मदत होणार आहे. यावेळी महाड वाहतूक विभागाचे वाहतुक पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील, माणगांव वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस श्री. लालासाहेब वाघमोडे, श्री .निवास साबळे हे उपस्थित होते. हे काम करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष पोळेकर यांनी जेसीबी देऊन मदत केली. हे काम केल्यामुळे वाहन चालकांकडून या कामा बद्दल वाहतूक पोलीसांचे कौतुक होत आहे.

Popular posts from this blog