श्री धावीर महाराज देवस्थान पालखी सोहळा पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
रोहा (समीर बामुगडे) : तब्बल १५९ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या रोहा नगरीचे आराध्य ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवस्थान पालखी सोहळा आज पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत पारंपारिक पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या समवेत आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, ज्येष्ठ नेते मधुकर पाटील, महेश मोहिते, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पोलिस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, कार्यवाह भूषण भादेकर, विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, लालताप्रसाद कुशवाह, सभापती महेंद्र दिवेकर, विश्वस्त नितिन परब, सुभाष राजे, समीर सकपाळ, आनंद कुलकर्णी, ॲड. सुनिल सानप, महेश सरदार, संदीप सरफळे, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, अनिल भगत, नितिन पिंपळे, अमित घाग, अमित उकडे, राजेश काफरे, रविंद्र चाळके, संजय कोनकर, महेंद्र गुजर, महेश कोल्हटकर, सौ. पूजा पोटफोडे आदींसह ट्रस्ट व उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व रोहेकर ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.
परंपरेप्रमाणे सकाळी ठीक साडेसहा वाजता शासकीय मानवंदना देण्यात येवून या अभूतपर्व सोहळ्याला सुरुवात झाली. रायगड पोलिसांच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित पोलीस पथकाने श्री धावीर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.
श्री धावीर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत देशमुख व उत्सव समिती अध्यक्ष शैलेश कोळी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत केले. मंदिर परिसरात ट्रस्ट, उत्सव समितीतर्फे श्री धावीर महाराजांची मनोभावे आरती करण्यात आली व त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.
पालखी सोहळा अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या तसेच जागोजागी सुबक व आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. शहरातील पालखी मार्गावर अनेक ठिकाणी पुष्पवर्षाव करून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री धावीर महाराज देवस्थान ट्रस्ट व उत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली त्याचप्रमाणे स्थानिक महसूल, पोलीस, नगरपरिषद, आरोग्य यंत्रणांनीदेखील हा सोहळा व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी चोख व्यवस्था ठेवली होती.