संत निरंकारी मिशन आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
निवी - रोहा येथे ७५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने केले रक्तदान
रोहा (समीर बामुगडे) : संत निरंकारी मिशनच्या ब्रांच रोहा व शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन निवी - रोहा येथे रविवारी ३ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. सदर रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. सध्याच्या कोविड-१९ चे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात आले होते.
सदर शिबीराचे उद्घाटन रायगड झोन ४० (अ) चे झोनल प्रबंधक श्री. प्रकाश म्हात्रे व क्षेत्रीय संचालक रायगड क्षेत्र श्री. प्रवीण पाटील तसेच श्री नरेश मारुती पाटील (सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वरसे) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्री अमित मोहिते (सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वरसे), श्री गुणाजी पोटफोडे, (कुणबी समाज अध्यक्ष, धाटाव ग्रुप) श्री राकेश गुरव (सदस्य ग्रामपंचायत वरसे) श्री महादेव म्हात्रे (सेक्टर संयोजक, पेण) श्री सुरेश पाटील (मुखी, बोरवे), श्री दगडू धामणे जी (मुखी, कोंडगाव), श्री मा. हि. पाटील गुरुजी (मुखी, पोयनाड) आदी उपस्थित होते. या शिबीरासाठी रायगड जिल्हा रुग्णालय, शासकीय रक्तपेढी अलिबाग, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दिपक गोसावी व त्यांचे कर्मचारी यांच्या माध्यमातून एकूण ७५ युनिट रक्त संक्रमित करण्यात आले.
याप्रसंगी, परम श्रद्धेय महात्मा प्रकाश म्हात्रे (झोनल प्रमुख रायगड 40 A) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संत निरंकारी मिशनची सामाजिक उपक्रमामध्ये कौतुकास्पद कामगिरी आहे. मिशनच्या माध्यमातून वर्षभर जिल्ह्यात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याचबरोबर आपत्कालीन मदतकार्य, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व अन्य सामाजिक उपक्रमांमध्ये संत निरंकारी मिशन हिरीरीने सहभाग घेत असते. सध्याच्या कोविड-१९ च्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदत कार्य इत्यादी समाजयोगी कार्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून अविरतपणे करत आहे. तसेच संत निरंकारी मिशन ब्रह्म ज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती करून प्रत्येक मानवमात्रामध्ये मानवीय गुण प्रस्थापित करत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत चव्हाण यांनी केले.
दरम्यान, सदर शिबिराचे नियोजन मुखी, हणमंत चव्हाण सर व स्थानिक सेवादल अधिकारी मंगेश रटाटे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले होते. सदर शिबिरास राकेश बामुगडे, प्रकाश भोकटे, जितेंद्र तुपकरजी, अनिल बामुगडेज, नंदकुमार भगत, नामदेव म्हात्रे, सुभाष सिंगरे, संतोष भोकटे आदी महात्मा गणाचे बहुमोलाचे योगदान लाभले.