आंबा व काजू साठी विमा योजनेचा लाभ घ्यावा कृषी कार्यालयाचे आवाहन
तळा (संजय रिकामे) : तळा तालुक्यामध्ये भात पिकानंतर काजू व आंबा ही महत्त्वाची पिके आहेत. फळ पिकांचे बाजार मूल्य अधिक असल्याने चांगले उत्पन्न देखील मिळते. परंतु मागील २-३ वर्षाचा अंदाज घेता हवामानातील बदलामुळे होणारे नुकसान विचारात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे.
सन २०२१-२२ ते २०२३-२४ या ३ वर्षासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक झाली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना हि योजना एच्छिक आहे. परंतु योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास कर्जदार शेतकऱ्यांना विहित मुदतीत मध्ये घोषणापत्र बँकेला सादर करणे आवश्यक आहे. कुळाने तसेच भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी देखील योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात . या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत 30 नोव्हेंबर २०२१ पर्यंत आहे. काजूसाठी १ डिसेंबर २०२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अवेळी पाऊस व कमी तापमान या बाबींसाठी नुकसान भरपाई देय असणार आहे. तसेच आंबा पिकासाठी १ डिसेंबर २०२१ ते १५ मे २०२२ पर्यंत अवेळी पाऊस, कमी तापमान , जास्त तापमान व वेगाचा वारा इ. बाबींसाठी भरपाई देय असणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ७/१२ उतारा, आधार कार्ड, बँक खाते, फळबाग उत्पादनक्षम असल्याबाबत स्वयंघोषणापत्र व फळबागेचा geotag केलेला फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक, विविध कार्यकारी सोसायटी, आपले सरकार केंद्र तसेच पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in च्या माध्यमातून योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात.
आंबा पिकासाठी प्रति हेक्टर ९३,८०० रु. इतका विमा हप्ता असून त्यापैकी शेतकरी हिस्सा २९,४०० रु. प्रती हेक्टर म्हणजेच 294 रु. प्रति झाड व काजू पिकासाठी एकूण विमा हप्ता ३०,००० रु. प्रति हेटर इतका असून त्यापैकी शेतकरी हिस्सा ५,००० रु. प्रति हेटर म्हणजेच २५ रुपये प्रति झाड याप्रमाणे आहे. उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासन अनुदान म्हणून विमा कंपनीस देणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी साहाय्य्क, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. सागर वाडकर यांनी केले आहे.