लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला रोहेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद!
महाविकास आघाडीतील नेत्यांच्या एकजुटीचे रोहेकरांना दर्शन, वरुणराजानेही दिला 'बंद'ला पाठिंबा
रोहा (रविना मालुसरे) : उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे केंद्रीय मंत्री येणार असल्यामुळे रस्त्याच्या बाजुला तेथील शेतकरी शांततामय निषेध करण्यासाठी उभे होते. निर्दयी सत्तांध लोकांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली.त्या खाली अनेक निष्पाप शेतकरी चिरडले गेले. काय दोष होता त्यांचा? शेतकरी उत्तर प्रदेशातील असो नाही तर महाराष्ट्रातील, शेतकरी जगला तर व्यापारी जगेल, तुम्ही आम्ही सारे जगु. जगाच्या पोशिंद्याला असे अमानुष वागणूक देणाऱ्या वृत्तीचा कडाडून निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने आज रोहा नगरपालिकेच्या शरदचंद्र पवार भवनासमोरील चौकात रोहा शहरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र आले.केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांप्रती वर्तणुकीचा यावेळी निषेध करण्यात आला.केंद्रीय तपास यंत्रणेंकडून महाराष्ट्रातील सुरू असलेली झाडाझडती व वाढत्या महागाईची किनार ह्या बंदला होती.घटक पक्षातील एकजुट ह्या बंदच्या निमित्ताने नागरिकांना पाहवयास मिळाली.
यावेळी व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आपापली दुकाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला.दुकाने बंद करण्यासाठी कुठेही सक्ती करण्यात आली नाही.तसेच बंदची झळ सामान्य नागरिकांना बसणार नाही याची काळजी घेताना कार्यकर्ते दिसत होते.बंद हा फक्त प्रतिकात्मक होता. तर बंद काळात ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने मात्र जोरदार बॕटींग करुन जनजीवन विस्कलित केले.जणुकाही वरुणराजाचाही बंदला पाठींबा होता.
बंद यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष,शिवसेना,काँग्रेस आय व इतर सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.