शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवक आणि शिपाई स्वतःलाच समजतात डॉक्टर!
सुमारे १०० गावातील नागरिकांचा आधार असलेले शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्र चालवतात शिपाई?
माणगांव (प्रमोद जाधव) : माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागात असणारे शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्र हे या विभागातील सर्वात मोठे समजले जाणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जवळपास विळे विभाग ते पुणे जिल्हा व रायगड जिल्हा यांची सीमारेषा असलेले गाव कोंडेथर पर्यंतच्या सर्व म्हणजे एकूण सुमारे १०० गावातील नागरिक या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लाभ घेत असतात.
मात्र मागील काही महिने व दिवस व कोरोना काळ यामध्ये अनेक प्रकार या शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक सुरेश गवळे व शिपाई वामन काटकर यांच्या संगनमताने चालु असल्याच्या मौखिक तक्रारी या विभागातील नागरिकांनी पत्रकारांना सांगितल्या व माणगांवमधील सुजाण पत्रकारांनी या सर्व बाबी माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदिप इंगोले यांच्या कानावर घातल्या.मात्र संबंधित गोष्टींची विचारणा अथवा खुलासा वैद्यकीय अधीक्षकांकडून घेण्यात आला की नाही? याची काही माहिती नाही.
मात्र अजूनही शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व शिपाई यांची मूजोरगिरी व असभ्य व दादागिरीची वर्तणूक तशीच सुरू आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांशी उद्धटपणे उर्मटपणे बोलणे व वागणे. आपल्या पदापेक्षा वरचे भासवून स्वतः डॉक्टर असल्याचे भासवणे. अशा प्रकारच्या अनेक मौखिक तक्रारी नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना केल्या आहेत आणि जर माणगांव उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना या गोष्टीचा पाठपुरावा करून संबंधित मूजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास जमत नसेल तर रायगड जिल्हा शल्यचिकित्सक यांनी माणगाव तालुक्यातील या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी शिरवली विभागातील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.