तळा (संजय रिकामे) : तळा नगरपंचायत निवडणुका लागण्यापूर्वी अजूनही काही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे असून, काहीजण भाजपचा "जय' म्हणणार असल्याची चर्चा आहे. परिणामी, भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताकारणात उलथापालथ होणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे मात्र भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
रवीभाऊ मुंढेमुळे समीकरण बदलणार
तळा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चंचुप्रवेश केला आता मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख रवीभाऊ मुंढे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे तळा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व राहणार असुन भाजपाची सत्ता येणार या दिशेने पक्षाची वाटचाल सध्या सुरु आहे.तळा नगरपंचायत निवडणुकीपुर्वी तालुक्यातील वातावरण ढवळुन निघणार असल्याने नगरपंचायतीतील सत्तेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झुंजावे लागणार आहे.
तळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासुन राष्ट्रवादीचा बालेकील्ला राहीला असला तरी तळा शहरात अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता काबीज करण्यास अपयश आले आहे.ग्रामपंचायत ते नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता कायम राहीली आहे. आता मात्र खरया अर्थाने रायगड जिल्ह्यात आणि विशेष करुन तळा तालुक्यात भाजपाची लाट पसरली असुन त्या लाटेवर रवीभाऊ मुंढे स्वार झाले आहेत त्यामुळे भाजपाची ताकद लक्षणीय वाढली असल्याने नगरपंचायतीत भाजपाचे कमळ फुलण्याची आशा उंचावली आहे.
तळा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 15 भोईर वाडी येथील संदिप कदम यांनी त्यांच्या सहकारयांसह भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, महाराष्ट्र प्रदेश सचिव रवीभाऊ मुंढे, तालुका अध्यक्ष निलेश रातवडकर सरचिटणीस रमेश लोखंडे, शहराध्यक्ष सुधीर तळकर,युवा शहराध्यक्ष सुयोग बारटक्के, मोरेश्वर गोरीवले, अंकुश सालेकर भोईर वाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.त्याचप्रमाणे शहरातील भाजपा महीला संघटन मजबुत करण्याच्या दृष्टीने महिला मोर्चा तळा शहर अध्यक्षपदी अमृता विराज टिळक व शहर सचिव पदी किशोरी गिरीश श्रोत्री यांची निवड करण्यात आली आहे. तळा नगरपंचायतीमध्ये भाजपा प्रदेश सचिव रवीभाऊ मुंढे यांच्या सौभाग्यवती सौ. रेश्मा मुंढे यांनी पाच वर्षे नगराध्यक्ष पद भुषविले असुन नगरपंचायतीत केलेल्या विकासकामांमुळे एकंदरित भाजपाचे बल वाढण्यास मदत होणार आहे.