शिवशंभु प्रतिष्ठान रोहा रायगड यांच्या विद्यमाने विविध गडांवर दसरा गडपूजन कार्यक्रम संपन्न

गडकोटांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम 

रोहा (रविना मालुसरे) : रोहा तालुक्यातील सामाजिक भान असणारी संस्था म्हणून नामांकित असलेल्या शिवशंभो प्रतिष्ठान यांचा मार्फत  मागील सात वर्षांपासून अविरतपणे दसरा गड पूजन कार्यक्रम रोहा तालुक्यातील चार प्रमुख गडांवर साजरा करण्यात येतो. यामध्ये किल्ले अवचित गड,किल्ले घोसाळ गड,किल्ले भवानी गड (चणेरे बिरवाडी),घेरासुरगड ( खांब -वैजनाथ)यांचा समावेश असतो. तसेच अखंडपणे गडसंवर्धन मोहिम या सर्व गडांवर सुरु असते.

छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास जपण्याचे काम प्रतिष्ठानाचे मावळे करत आहेत.गडकोटांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ते करत असलेले काम प्रशंसनीय आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवशंभु प्रतिष्ठान या संस्थेकडून किल्ले अवचितगड, किल्ले घोसाळेगड, किल्ले बिरवाडीगड आणि किल्ले घेरासूरगडावर दसरा गडपुजन कार्यक्रम  उत्साहात पार पडला. शिवशंभु प्रतिष्ठान या संस्थेच्या मार्फत गडांवर दिपावली पहाट, दसरा गडपुजन असे विविध उपक्रम राबवले जातात. तसेच गडकोट संवर्धन मोहिमा राबवत गडकोट स्वच्छ केले जातात.मागील आठ वर्ष गडकोटांवर कार्य करणाऱ्या या संस्थेची ध्येये धोरणे इतर तरूणांना प्रेरणा देणारी आहेत. किल्ले अवचितगडावर दसरा गडपुजन साजरा होत असताना महाद्वार झेंडूच्या फुलांनी सुशोभित केले होते,महाद्वाराचे पुजन करुन शस्ञपुजा करण्यात आली. तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे यांनी उपस्थित तरूणांना मार्गदर्शन केले.गड संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या साथीला प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रशांत बर्डे यांनी तरूणांना दसरा गडपुजनाचे महत्त्व पटवून दिले. दसरा गडपुजनासाठी अवचितगडावर ६० मावळे उपस्थित होते..

अवचितगडाच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेप्रमाणेच घोसाळगडावर ७० मावळे उपस्थित होते. तर तिथेही महाद्वार पूजन करुन शस्ञपुजन करण्यात आले. तर प्रतिष्ठानचे मार्गदर्शक श्री.अमरदिप म्हाञे सरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गडपुजन संस्कृतीचे महत्त्व पटवून दिले. किल्ले बिरवाडीगडावर झालेल्या दसरा गडपुजनात बिरवाडी ग्रामस्थांची उपस्थिती विशेष होती.महाद्वारावर झेंडूच्या फुलांच्या माळा लावून दरवाजा सजवला होता.तर उपस्थित दापंत्याच्या हस्ते ३५ मावळ्यांच्या उपस्थितीत महाद्वार पूजन आणि शस्ञ पूजन करण्यात आले. बिरवाडीचे ग्रामस्थ श्री.मुंगळे गुरुजी यांनी शब्दसुमनांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रतिष्ठानचे आधारस्तंभ श्री.श्रीकांत जंगम यांनी मावळ्यांना मार्गदर्शन करताना प्रतिष्ठानच्या गडकोट संवर्धन कार्यात सामील होण्याचे आवाहन केले. किल्ले घेरासुरगडावरही प्रतिष्ठानच्या सदस्यांनी भगवा झेंडा फडकवून महाद्वार आणि शस्ञपुजा केली.तसेच मयुर कापसे,अस्मित महाडीक आणि सनील इंगवले यांनी जमलेल्या मावळ्यांना संबोधित करुन घेरासुसर गडाचा इतिहास तथा भुगोल उलगडून सांगितला.

अशा प्रकारे संस्कृती जपण्याचे महत्तम कार्य शिवशंभु प्रतिष्ठान कडून नेहमीच होत असते.त्यांच्या या कार्याची प्रेरणा घेऊन तालुक्यातील अनेक तरुण या कार्यात जोडले गेले आहेत.छञपतींचा वारसा जपण्याचे अलौकिक कार्य शिवशंभु प्रतिष्ठानकडून होत आहे . त्यामुळे समाजातील प्रत्येक स्तरातून प्रतिष्ठानच्या मावळ्यांना आदराची वागणूक मिळत आहे.तसेच वरिष्ठांकडून कौतुकाची थाप नेहमीच मावळ्यांच्या पाठीवर पडत असते.

Popular posts from this blog