शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रोटॉन राष्ट्रीय ट्रेड युनियन माणगांव तालुका अध्यक्षपदी पराग जाधव
माणगांव (उत्तम तांबे) : माणगांव येथे झालेल्या प्रोटॉन अर्थात प्रोफेसर, टीचर आणि नॉन टीचींग स्ताफ संघटनेच्या मीटिंगमध्ये माणगांव तालुका अध्यक्ष म्हणून पराग जाधव यांची निवड झाली. महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ. प्रो. लोखंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मिटींगमध्ये ही निवड करण्यात आली. या मिटींगला मार्गदर्शन करताना लोखंडे सर म्हणाले की, येणाऱ्या काळात शिक्षकांनी शिक्षण वाचवले पाहिजे तसेच समाजाची लढाई लढली पाहिजे. तरच शिक्षकांची नोकरी जिवंत राहील. नवीन शैक्षणिक धोरण २०२० या अंतर्गत देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होऊन बहुजनांचे शिक्षण संपण्याच्या मार्गावर आहे. जर शिक्षण संपले तर शिक्षक सुद्धा संपल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शिक्षकांनी स्वतः जागृत झाले पाहिजे व समाजाला जागृत केले पाहिजे. येणाऱ्या काळात सरकार कडून पेन्शन किंवा इतर सुविधा मिळतील याची कोणतीच गॅरेंटी राहिलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आपण सर्व शिक्षण क्षेत्राशी संबंधित कर्मचारी यांनी एकत्र येऊन एक राष्ट्रव्यापी लढा उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रोटोनची निर्मिती झाली असून आपण येणाऱ्या काळात मोठा देशव्यापी लढा उभा करणार आहोत. यासाठी आपली सर्वांची साथ असणे गरजेचे आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन म्हणून आद. आडेसर प्रोटॉन रायगड जिल्हा प्रभारी यांनी सूचित केले की, आज रायगडजिल्ह्यात मध्ये अनेक संघटना आहेत. मात्र शिक्षकांच्या वैयक्तिक समस्या सोडताना दिसत नाही. ज्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होत आहेत ते बदल बहुजनांच्या हिताचे नाहीत यावर कोणती संघटना बोलायला तयार नाही. शिक्षण सेवक पदा बद्दल कोणत्याही संघटनांनी आवाज उठवला नाही. त्याचबरोबर शिक्षणाचे खासगीकरण होत आहे यासाठी कोणती संघटना बोलायला तयार नाही कमी पटाच्या शाळा बंद होत चालल्या आहेत हे सगळे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. म्हणून प्रोटान येणाऱ्या काळात हे सर्व मुद्दे घेऊन लढणार आहे .त्याचबरोबर शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्न सोडवणे हे संघटनेचे आदय कर्तव्य असून संघटनेकडे सुप्रीम कोर्टापासून ते जिल्हा कोर्टापर्यंत निष्णात वकील यांची टीम आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जे शिक्षक प्रोटॉन चे सभासद असतील त्यांचा प्रश्न हा त्यांचा वैयक्तिक न राहता तो संघटनेचा प्रश्न बनेल व संघटन त्यांना कोणत्याही आर्थिक खर्चात न पडता त्यांची लढाई लढण्यास कटिबद्ध असेल. असे म्हणाले या कार्यकारणी मध्ये एकूण पंधरा सदस्य असून या संघटनेच्या विविध पदावर स्वखुशीने कार्यकर्त्यांची नेमणूक झाली आहे. तसेच अध्यक्ष म्हणून पराग जाधव यांनी आपली भूमिका मांडली की,मी अनेक सामाजिक संघटनेमध्ये काम करत आलो आहे. त्याचबरोबर शिक्षक संघटनांचा मला चांगला अनुभव आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकर या विचाराने प्रेरित झालेल्या किंवा त्यांचे कार्य करणाऱ्या संघटनेमध्ये काम करायला मला निश्चितच आवडेल. शिक्षकांच्या वैयक्तिक प्रश्नांना मी प्राधान्यक्रम देऊन त्याचबरोबर समाजातील शिक्षण व शिक्षक वाचला पाहिजे यासाठी संघटनेचा आदेशानुसार जे काही आंदोलन पुकारण्यात येईल त्या सर्व आंदोलनामध्ये मी व माझी टीम सक्रिय सहभागी असेल व येणाऱ्या काळामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय यावर आधारित समाज व राष्ट्र निर्माण करण्याच्या कामी मी स्वतःला झोकून देत आहे .ही लढाई माझी वैयक्तिक लढाई नसून समाजाची लढाई आहे व ती लढण्यास मी कधीही मागे पुढे पाहणार नाही. सर्वांना बरोबर घेऊन एक समतेच्या विचार समाजामध्ये पेरण्याचे काम निश्चितपणे मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करण्याचा प्रयत्न करीन. या निवडीबद्दल मी वरिष्ठ यांना धन्यवाद देतो की, राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनेचे माणगाव तालुका अध्यक्षपद मला मिळाले त्याबद्दल मी संघटनेचा अत्यंत ऋणी आहे. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा प्रोटान कार्याध्यक्ष कासे सर, तसेच प्रोटॉन जिल्हा सदस्य पावरा सर उपस्थित होते. या संघटने मध्ये अंगणवाडीपासून सीनियर कॉलेज पर्यंतचे सर्व सदस्य घेण्यात आले आहेत तसेच सर्व प्रवर्गातील सदस्य या संघटनेचे सदस्य आहेत त्यामुळे एक परिपूर्ण अशी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याची प्रोटॉन कार्यकारणी निर्माण झाली आहे. या कार्यकारणीचे रायगड जिल्ह्याच्या वतीने कासे सर यांनी मनःपूर्वक स्वागत केले.शेवटी आद पावरा सर यांनी आभार मानले. व ही सभा संपन्न झाली.