रायगड जिल्ह्यात तळा, मुरूड, श्रीवर्धन, पोयनाड येथे अवैध मटका-जुगाराला सुगीचे दिवस!
ॲड. काशिनाथ ठाकूर यांची थेट गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार, तातडीने कारवाई करण्याची मागणी
रायगड जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर 'प्रहार जनशक्ती' संघटनेचा प्रहार!
रायगड (प्रतिनिधी) : सध्या रायगड जिल्ह्याला सर्वत्र अवैध धंद्यांनी पोखरलेले असून जिल्ह्यात सर्वत्र बेकायदा मटका-जुगाराचे तांडव सुरू असल्याचे दिसत आहे. दरम्यान, तळा, मुरूड, श्रीवर्धन, पोयनाड येथे तर मटका-जुगार राजरोसपणे सुरू असल्यामुळे येथे मटका-जुगाराला सुगीचे दिवस आल्याचे बोलले जात आहे. परंतु या अवैध मटका-जुगाराच्या धंद्यांवर कारवाई होणार की नाही? हा प्रश्न आज देखील गुलदस्त्यातच आहे. प्रहार जनशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी तर याप्रकरणी थेट गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील अवैध धंद्यांबाबत पोलीस महासंचालकांनी विशेष मोहिम हाती घ्यावी व ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका-जुगार सुरू असेल तेथील प्रभारी पोलीस अधिकाऱ्यावर प्रथम कारवाई करावी अशी मागणी ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.