शिहू येथे वीज अंगावर पडून तरुणाचा मृत्यू
नागोठणे (मंजुळा म्हात्रे) : सध्या कोकणासह अख्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गुलाब नंतर शाहीन चक्रीवादळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक नेस्तनाबूत झाल्याचे पाहवयास मिळत आहे.
दिवसभर हवेत उष्णता आणि संध्याकाळी विजांच्या कडकडासह कोसळणारा पाऊस यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच रविवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास शिहू विभाग परिसर ढगांच्या व विजांच्या गडगटाने दणाणून गेला असतानाच दिलीप बाळाराम पाटील (वय ४८) हे आपल्या शेतावरून घरी येत असताना अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शिहू येथील रहिवासी दिलीप पाटील हे आपल्या शेतावरून घरी येत असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घरातील अशा कर्त्या पुरुषाचं वीज पडून मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर जोराचा आघात झाला आहे व शिहू विभागात हळहळ व्यक्त होत आहे.