पनवेल आणि नवी मुंबई परिसरात बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू! 

बेकायदा जुगार क्लबला पोलीस ठोकतात सलाम? 

तक्रार करणाऱ्यांना पोलीस अधिकारी करतात 'ब्लॉक' 

ॲड. काशिनाथ ठाकूर यांच्याकडून कारवाईची मागणी 

रायगड (प्रतिनिधी) : पनवेल आणि नवी मुंबई परिसरात बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू असल्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालल्याची तक्रार प्रहार जनशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. 

पनवेल तालुक्यातील सुकापूर येथे टायटन बार च्या समोर 'राज सोशल क्लब' नावाचा पत्त्यांचा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहे. त्याचप्रमाणे कामोठे येथील सेक्टर १४ येथील झिंगाट बारच्या 'समोर विनम्र सोशल क्लब' नावाचा बेकायदा जुगार क्लब सुरू आहे. तसेच, पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी येथे भाजपा कार्यालयासमोर 'साईश्रद्धा क्लब' नावाचा बेकायदा जुगार क्लब राजरोसपणे सुरू आहे. 

या भयानक प्रकारामुळे पनवेल आणि नवी मुंबई परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्ट होत चालले आहे. विशेष म्हणजे या बेकायदा जुगार क्लबना पोलीसांचा वरदहस्त असल्याचे दिसून येत आहे. कारण एखाद्या तक्रारदाराने जर या बेकायदा जुगार क्लब विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली तर संबंधित वरिष्ठ अधिकारी हे त्या तक्रारदारांचा नंबर 'ब्लॉक' करतात! त्यामुळे येथील वरिष्ठ अधिकारी हे जुगार क्लब चालकांच्या 'ताटाखालचे मांजर' बनले असल्याचे स्पष्ट होत चालले आहे आणि विशेष म्हणजे असे पोलीस अधिकारी म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली कीड आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही! कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने 'पोलीस' हा एक महत्वाचा घटक समजला जातो, परंतु एखाद्या ठिकाणी जर पोलीसच अवैध धंद्यांची पाठराखण करून त्यांना अभय देत असतील तर....? हा 'कुंपणाने शेत खाण्या'चा प्रकार आहे असेच म्हणावे लागेल! परिणामी अशा पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा सरचिटणीस ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी केली आहे.

Popular posts from this blog