रोह्यात उसळला युवकांचा महापुर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळावा तुफान जल्लोषात संपन्न

"पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचा भ्रमनिरास झालाय म्हणूनच ते आमच्या पितृतुल्य नेतृत्वावर टिका करीत आहेत" - खासदार सुनिल तटकरे यांचा फडणवीसांना चिमटा!

आमदार निलेश लंकेंनी जिंकली युवकांची मने

रोहा (रविना मालुसरे) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा रविवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२१ रोजी  सायंकाळी सहा वाजता रोहा येथे उत्साहात संपन्न झाला.रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्यासह जिल्हा युवक मेळाव्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,आमदार सुनिल शेळके,जनसेवक आमदार निलेश  लंके,जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील,विजयराव मोरे,तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर,संतोष पोटफोडे,जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे,गीता जाधव,मनवे,रामचंद्र सकपाळ,सुरेश मगर,प्रितम पाटील,गीता पालरेचा,सायली दळवी,अजय बिरवाडकर,सागर भोबड,रोहा तालुका युवक अध्यक्ष जयवंतदादा मुंडे,तालुका युवती अध्यक्षा रविना मालुसरे  इत्यादी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

आगामी नगर पालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या मेळाव्याला राजकीयदृष्ट्या खूप महत्त्व होते. पक्षसंघटन अधिक मजबूत करून निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा निर्धार व विजयी होण्याचा चंग बांधण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या मेळाव्यातुन बिगुल फुंकून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांनी केले.आपल्या नेत्यांवर टिका झाल्यास त्यांना जशास तसे उत्तर देणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.

आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी युवक वर्गाने मेहनत घेऊन केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले .तर आगामी निवडणुकांमध्ये आपण आघाडी धर्माचे पालन करु किंवा पक्ष जो निर्णय घेईल त्याचे पालन केले जाईल,असेही त्यांनी सुचित केले.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मुद्देसुद भाषणात विधानभवनातील नव्यानेच निवडून गेलेल्या तरुण आमदारांचे अनुभव सांगितले.लोकविकासासाठी आघाडी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

लोकनेते मावळचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांनी बोलताना मावळ व रायगडचे नाते स्पष्ट केले.खासदार सुनिल तटकरे यांच्या आधाराने आपण राजकिय जीवनात उभे राहिलो हे त्यांनी प्रांजलपणे कबुल केले. 

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपली साधी राहणी व उच्च विचार सरणीचे दर्शन घडविले.कोविड काळातील आपले अनुभव त्यांनी सांगितले.राजकारणापेक्षा समाजकार्य अधिक करण्याचा सल्ला त्यांनी दिला.अनिकेत तटकरेंच्या सोबत असलेली युवा शक्ती पाहून आपण आचंबीत झालो आहोत.पुढील राजकीय प्रवास हा या युवकांमुळे सहजशक्य आहे असे भाकित करण्यास ते विसरले नाहीत.

खासदार सुनील तटकरे यांनी बोलताना अनिकेत तटकरे,आदिती तटकरे,निलेश लंके,सुनिल शेळके ही तरुण आमदार मंडळी ज्येष्ठांच्या पावलावर पाऊल ठेवून विधानभवनात आपला ठसा उमटवताना दिसत आहेत हे कौतुकास्पद आहे असे सांगितले.नव्या दमाच्या नेतृत्वाचा पक्षसंघटनासाठी खूप चांगला उपयोग होत आहे.मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचा भ्रमनिरास झालाय,म्हणूनच ते आमच्या पितृतुल्य नेतृत्वावर टिका करीत आहेत.असे बोलुन विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी चिमटा काढला.महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली चांगले काम करीत असुन विरोधकांच्या टिकेकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत असे सांगताना त्यांनी अनंत गीते यांच्या टिकेला उत्तर देणे टाळले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत रायगड जिल्ह्यात आपणच नंबर एक वर राहू असा आशावाद त्यांनी व्यक्त करुन आधिकाधीक तरुणांना निवडणुकीत तिकिट देण्याचा मानस व्यक्त केला.मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अंकित साखरे,जयवंत मुंडें व सहकाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

ह्या अभुतपूर्व पर्वणीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्या अगोदर निघालेल्या रॕलीने व आतषबाजीने लोकांचे लक्ष वेधले गेले.या कार्यक्रमात मालसई ग्रामपंचायत माजी सरपंच नथुराम मालुसरे,उपसरपंच सुनिल मोहिते व अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Popular posts from this blog